भारतात कृत्रिम पावसाचे प्रयोग केले पाहिजेत – डॉ. रामचंद्र साबळे

273

तापमानात होणारी वाढ आणि हवामानातील बदल यामुळं मान्सूनवर नकारात्मक परिणाम होत आहेत. त्यासाठी चीनच्या धर्तीवर सातत्यानं भारतातही कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्याची आवश्यकता असल्याचं मत, हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना व्यक्त केलं.

मान्सून पाऊस हा भारताला वरदान ठरलला आहे. आपल्याकडे साधारणतः 7 जुनला पाऊस पडणं अपेक्षित असतं. तसेच मृगनक्षत्रात तर निश्चित पाऊस येत असे. मात्र, गेल्या 19 वर्षांमध्ये तापमान वाढ आणि हवामानात होणार बदल या मुख्य कारणांमुळे मान्सूनच्या आगमनावर आणि वितरणावर परिणाम झालेला आहे, असं निरीक्षण डॉ. साबळे यांनी नोंदवलंय.

मान्सूनवर परिणाम करणारे घटक

वृक्षतोड – कार्बन डायॉक्साईड, मिथेन गॅस आणि नायट्रस ऑक्सईड या वायूंच्या होणाऱ्या उत्सर्जनामुळे तापमानात वाढ झालेली आहे. कार्बन डायॉक्साईड या वायूला शोषणारा मुख्य घटक आहे वृक्ष. मात्र, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. आशिया खंडातील आकडेवारी पाहायची झाली तर 60 लाख हेक्टर, आफ्रिका खंडात 55 लाख हेक्टर तर लॅटिन अमेरिकेत 85 लाख हेक्टर जंगल तोड झालेली आहे. त्याचाही परिणाम तापमान वाढीवर होतोय, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिलीय.

तापमान वाढ – तापमानाची अवस्था बघायची झाली तर 0.5 डिग्री सेल्सिअसने पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे. संपूर्ण भारतात सरासरी 40 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. पुण्यातही जवळपास 42 डिग्री सेल्सिअसनं तापमान गेलं होतं. यावर उपाय म्हणजे मोठ्याप्रमाणावर वृक्षलागवड करणे. आर्द्रतेचं प्रमाण कमी झालं की, ढग निर्मिती कमी होते. त्यामुळं साहजिकच पावसाचं प्रमाण कमी होतं आहे. तसेच वाऱ्याचा वेग हा एक महत्वाचा घटक मान्सूनवर परिणाम करतो. वाऱ्याचा वेग मंदावला की, पावसाचं सातत्य कमी होतं व खंडित पाऊस यायला लागतो. यंदाही तशी परिस्थिती आहे. थोडाफार या महिन्यात त्यानंतर जुलै व ऑगस्ट असा खंडित पाऊस पडू शकतो, असं डॉ. साबळे यांना वाटतं.
कृत्रिम पावसाचे प्रयोग सातत्यानं केले पाहिजे.

‘कृत्रिम पाऊस’ या तंत्राद्वारे पावसाचं प्रमाण वाढते. चीन ज्याप्रमाणे या तंत्राचा वापर करून पावसाचं प्रमाण वाढवतो. दुप्पटीने पावसाची नोंद चीनमध्ये होतं आहे. त्याप्रमाणे भारतातही या तंत्राचा मोठ्या प्रमाणात सरकारनं वापर करणं गरजेचं आहे, असं मत डॉ. साबळे यांनी व्यक्त केलंय.

ठिबक सिंचनाची चळवळ उभारली पाहिजे

इस्रायल आणि भारतातील मुख्य फरक हा तंत्राचा आहे. इस्रायलमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असूनही ठिबक सिंचनाद्वारे तेथील शेतीचा कायापालट झाला आहे. भारतातही या तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होण आवश्यक आहे. त्यासाठी भारत सरकारनं सबसिडी वाढवली पाहिजे. ठिबक सिंचन अशी एखादी चळवळ उभारली तर हे सगळं सहज शक्य आहे, असं डॉ. साबळे यांचं म्हणणं आहे.