इंटरनेट शटडाऊनमध्ये भारत जगात अव्वल….

भारताला आर्थिक महासत्ता करण्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारनं एका बाबतीत देशाला अव्वल केलंय, पण या अव्वल स्थानामुळे जगभरात भारताची मान खाली गेलीये.२०१८ आणि २०१९ मध्ये जगभरात करण्यात येणाऱ्या इंटरनेट शटडाऊनपैकी ७० टक्के शटडाऊन हे भारतात करण्यात आलंय.

जगभरात इंटरनेट शटडाऊन करणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण पाकमध्ये फक्त १२ वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आलंय, तर भारतात तब्बल १३४ वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आलंय.

२०१९ या वर्षात तब्बल १०४ वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आलंय. यात इंटरनेट एकदा बंद करण्यात आलं म्हणजे झालं असं नाही तर काश्मीरमध्ये एका शटडाऊनमध्ये तब्बल १४३ दिवस एक इंटरनेट शटडाऊन कायम आहे. आतापर्यंतचं हे सगळ्यात मोठं इंटरनेट शटडाऊन ठरलंय आणि याचा फटका तब्बल सव्वा कोटी नागरिकांना बसलाय.ईशान्येकडे आसाममध्ये तब्बल १० दिवसांचं इंटरनेट शटडाऊन करण्यात आलं याचा फटका ५ कोटी नागरिकांना बसला.

या शटडाऊनचा फटका केवळ संवादाला बसलाय असं नाही तर इंटरनेटवर आधारित सेवांद्वारे व्यवसाय करणाऱ्या ओला-उबर, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन यांनाही बसलाय. इंटरनेट बेस अँप्सवर आता अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. जीएसटीपासून तर अनेक टॅक्स ऑनलाईन भरणे सक्तीचं आहे.

त्यामुळे इंटरनेट बंद असलेल्या भागात याची मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. या इंटरनेट शटडाऊनचा फटका सामान्य ग्राहक, लघू उद्योजकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना बसतोय. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली सरकारनं हे इंटरनेट शटडाऊन केलंय.

तशी गरज असेल तर ते करण्यास हरकत नाही, पण काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं इंटरनेट शटडाऊन करण्यात आलं, त्याचा फटका कोट्यवधी लोकांना बसलाय, त्यांचा यात काय दोष होता, असाही सवाल उपस्थित होतोय.