भाजप स्वबळावर सत्तेत येण्याची शक्यता कमी – राम माधव
Max Maharashtra | 7 May 2019 4:34 AM GMT
X
X
2014 प्रमाणे लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल? याचा अंदाज अद्यापपर्यंत कोणत्याही पक्ष बांधू शकला नाही. त्यामुळे आगामी सरकार कोणाचे येणार? राजकारण्यांनी याबाबत राजकीय आडाखे बांधायला सुरुवात केली आहे. त्यातच भाजप पुन्हा सत्तेत येईल का? याबाबत भाजपच्या अनेक नेत्यांना देखील शंका आहे. त्यातच भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव (ram madhav) यांनी देखील भाजप स्वबळावर सत्तेत येणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला 271 जागा मिळाल्यास आनंदच होईल, मात्र, अशी शक्यता कमी असली तरी कोणत्याही परिस्थितीत केंद्रात भाजप मित्रांसोबत सरकार बनवेल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी केला. बहुमतासाठी आवश्यक जादुई आकडा भाजपला गाठता आला नाही तरी ‘एनडीए’ला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.
उत्तरेकडील राज्यांत मागच्या वेळेस भाजपला लोकसभेच्या रेकॉर्डब्रेक जागा मिळाल्या होत्या. यावेळी तशी परिस्थिती दिसत नाही. परंतु ओडिशा, पश्चिम बंगालबरोबरच पूर्वेकडील राज्यांत भाजपला चांगल्या जागा मिळतील. भाजप व मित्रपक्षांना मिळून 300 पेक्षा जास्त जागा या निवडणुकीत मिळतील असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली व पक्षाचे अन्य नेते सातत्याने भाजप 2014 पेक्षा अधिक मतांनी सत्तेत येईल असा दावा करत आहेत. मात्र, राम माधव यांनी बहुमताच्या आकडय़ापासून भाजप दूर राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
Updated : 7 May 2019 4:34 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire