Home > News Update > भारत चीन संघर्ष: कमांडर पातळीवरील चर्चेत झाला महत्त्वाचा निर्णय

भारत चीन संघर्ष: कमांडर पातळीवरील चर्चेत झाला महत्त्वाचा निर्णय

भारत चीन संघर्ष: कमांडर पातळीवरील चर्चेत झाला महत्त्वाचा निर्णय
X

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनदरम्यान झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर मोठा तणाव निर्माण झालेला आहे. पण आता हा तणाव कमी करण्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेले आहे.

चीनमधील मोल्दो येथे कमांडर पातळीवर झालेल्या चर्चेमध्ये पूर्व लडाखमधील सीमेवर कशा पद्धतीने तणाव कमी करायचा याची आखणी करून दोन्ही बाजू त्याचे पालन करतील असं ठरवण्यात आल्याचे समजते आहे. चीनच्या हद्दीतील मोल्दो येथे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती. सुमारे अकरा तास बैठक झाली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्यासंदर्भात एकमत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान लष्कर प्रमुख एम एम नरवणे हे लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. दोन दिवसांच्या दौर्‍यामध्ये ते सीमेवरील सर्व परिस्थितीची माहिती घेणार आहेत. याआधी हवाई दलाच्या प्रमुखांनी देखील लडाखमध्ये येऊन पाहणी केली होती. चीनने सीमेवर केलेल्या आगळीकीनंतर भारतामध्ये संतापाची तीव्र लाट उसळलेली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने देखील आक्रमक भूमिका घेत लडाखमध्ये अतिरिक्त सैन्य आणि युद्धसाहित्य जमा केले आहे.

एवढेच नाही तर चीनने आक्रमण केल्यास भारतीय लष्कराला सीमेवर निर्णयाचे सर्व अधिकार देखील सरकारने दिलेले आहेत. त्याचबरोबर चीनच्या सीमेवर शस्त्र वापरासंदर्भातले धोरणदेखील सरकारने बदलले आहे.

Updated : 23 Jun 2020 9:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top