विनावाहक बेस्टसेवेमुळे फुकट प्रवाशांचा संख्येत वाढ

233

बेस्ट प्रशासनाने मुंबईतील काही भागात विनावाहक बस सेवा सुरु केली आहे. मात्र, या सेवेचा लाभ सामान्य प्रवाशांपेक्षा फुकट्या प्रवाशांनाच होत असल्याचं दिसतंय. बेस्टच्या या विनावाहक सेवेमुळे विनातिटीक प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं बेस्ट प्रशासनाच्या लक्षात आलं आहे. फुकट्यांच्या वाढत्या संख्येमुळे बेस्टला आर्थिक फटका बसतोय.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या काही भागात बेस्टची ही विनावाहक सेवा सुरू आहे. अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच सुरु केला आहे. एसीला बससाठी ६ रुपये तिकीट आहे तर सध्या बससाठी ५ रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे, अतिशय स्वस्त दरात ही सेवा सुरु केली आहे.

या बसमधून प्रवास करायचा असेल तर, आधी तिकीट काढावं लागतं. भाडे तत्वावर चालवण्यात येणाऱ्या बसमध्ये फक्त एकच दरवाजा असल्यामुळे बस ठराविक थांब्यावरच थांबते. कंडक्टर नसल्याने प्रवासादरम्यान या बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आसन रिकामे असूनही बाहेरील प्रवाशांना प्रवास करता येत नाही. यामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे. यामुळे काही वेळा प्रवाशांची, बस चालकांसोबत वादावादही होत असते अशी माहिती बस चालक महेश क्षीरसागर यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

बेस्टच्या विनाएसी असलेल्या साध्या बसला दोन दरवाजे आहेत. ट्रॉफिकचा फायदा घेऊन अनेक प्रवाशी थेट मागच्या दाराने बसमध्ये घुसतात. याचा अनेकदा चालकाला अंदाज येत नाही. चालकाने विचारल्यावर अनेकठिकाणी प्रवाशांनी अरेरावी केल्याच्याही घटना आहेत.

यासंदर्भात आम्ही बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांना विचारले असता, या नव्या प्रयोगामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. ही गैरसोय टाळणे आणि वादावादी थांबवणे यासाठी बेस्टच्या समितीमध्ये चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. आधी बसमध्ये कंडक्टर असायचे तरी देखील लोक फुकट प्रवास करायचे. फुकट प्रवास करणे ही लोकांची विकृती आहे, अशी प्रतिक्रिया मनोज वऱ्हाडे यांनी दिली.

ही विनावाहक बससेवा बंद व्हावी अशी मागणी काही प्रवाशांनी केली. आता येत्या काही दिवसात बेस्ट समिती या समस्यांवर काय निर्णय घेणार आहे काही दिवसांत कळेल.