Home > News Update > डोनाल्ड ट्रम्प; महाभियोगातून सुटका, दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार का?

डोनाल्ड ट्रम्प; महाभियोगातून सुटका, दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार का?

डोनाल्ड ट्रम्प; महाभियोगातून सुटका, दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार का?
X

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातला महाभियोग प्रस्ताव सिनेटने फेटाळलाय. अमेरिकन प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजता सिनेट सभागृहात या प्रस्तावावर अंतिम मतदान झालं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पदाचा गैरवापर करणे आणि संसदेच्या कामात अडथळा आणण्याचे आरोप लावण्यात आले होते.

मात्र ४८ विरुध्द ५२ आणि ४७ विरुध्द ५३ मतांनी हे दोन्ही प्रस्ताव फेटाळले गेले. भारताप्रमाणे अमेरिकेच्या सिनेटमध्येही पक्षाधारीत मतदान झालं. या निकालामुळे तीन महिन्यांपासून सुरु झालेल्या महाभियोगाची प्रक्रीया अखेर संपुष्टात आली आहे.

सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत

१०० सदस्यांच्या सिनेट सभागृहात डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळला जाणार हे अपेक्षित होतं. मात्र या प्रस्तावावर निष्पक्षपणे चर्चा होणे अपेक्षित होतं. मात्र ती झाली नाही. उलट नवे पुरावे, नवे साक्षीदार बोलावण्यासही रिपब्लिकन सदस्यांनी विरोध केला. डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्याचा प्रस्तावही फेटाळला गेला.

त्यामुळे सिनेटमध्ये पहिल्या दिवसापासून ट्रम्प यांच्याविरुध्द कुठलाही पुरावा येऊ द्यायचा नाही अशी फिल्डीगंच सिनेटचे नेते मिच मॅक्नॉल यांनी लावली होती. मात्र या सुनावणीच्या निमित्तानं ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये राजकीय फायद्यासाठी आर्थिक मदत कशी रोखली होती, त्यावर रिपब्लिकन पक्ष कसा पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतोय याचं वास्तव मात्र जनतेपुढं आलयं. प्रस्ताव फेटाळल्यानंतर हा अमेरिकन जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. तर प्रतिनिधी गृहात याची चौकशी सुरुच राहील अशी घोषणा डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

रिपब्लिकन पक्षात फूट

रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर्स मिट रॉम्नी यांनी ट्रम्प यांच्याविरुध्द मतदान केलं. रॉम्नी यांनी बराक ओबामा यांच्याविरुध्द २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. “मला पक्षाविरुध्द मतदान करायचं नव्हतं, मात्र मी अमेरिकेच्या संविधानाची खोटी शपथ घेवू शकत नाही. त्यामुळे परिणामाची जाणीव असूनही ट्रम्प यांच्याविरुध्द मतदान करण्यास मी बाध्य आहे असं रॉम्नी यांनी म्हंटलं.

मात्र अमेरिकेचा इतिहास मला लक्षात ठेवेल आणि मी पुढच्या पिढीला हे अभिमानाने सांगू शकेल, या शब्दात रॉम्नी यांनी सिनेटपुढ त्यांची भूमिका ठेवली. मतदानानंतर ट्रम्प यांनी रॉम्नी हे डेमोक्रॅट पक्षाची छुपी संपत्ती असल्याच्या भाषेत त्यांची हेटाळणी केली. पक्षाविरोधात मतदान केल्यामुळे रॉम्नी यांना टार्गेट केलं जाण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर्सनी केली आहे. मात्र अमेरिकेत पक्षाच्या धोरणाविरोधात मतदान करण्याची एक मोठी परंपरा आहे.

ट्रम्प यांची पक्षावर मजबूत पकड

महाभियोग प्रस्तावाला सामोरे जाणारे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांची इतिहासात नोंद झाली आहे. मात्र महाभियोगाच्या निमित्तानं डोनाल्ड ट्रम्प यांची रिपब्लिकन पक्षावर किती मजबूत पकड आहे हे स्पष्ट झालंय. युक्रेन प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांची कृती असंवैधानिक आहे, ट्रम्प यांनी सत्तेचा दुरुपयोग केलाय, हे माहिती असूनही रिपब्लिकन सिनेटर्सनी ट्रम्प यांची पाठराखण करणं पसंत केलं. दोन सिनेटर्सनी ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केलं नाही, मात्र ट्रम्प यांनी पदाचा गैरवापर केल्याचं त्यांनी जाहीररित्या मान्य केलं. मात्र दहा महिन्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. लोकाच्या कोर्टातच ट्रम्प यांचा फैसला झाला पाहिजे असं या सिनेट सदस्यांचं म्हणणं आहे.

काय आहे प्रकरण?

२०२० मध्ये होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी युक्रेनमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे अध्यक्षपदाचे दावेदार आणि माजी उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांच्या मुलाच्या ऊर्जा कंपनीची चौकशी नव्याने सुरु करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनवर दबाव टाकला होता. युक्रेनची आर्थिक मदत काही काळाकरीता थांबवली होती. त्यानंतर अमेरिकन प्रतिनीधी सभागृहाने (अमेरिकन काँग्रेस) ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव पारीत केला होता.

प्रतिनिधी गृहात डेमोक्रॅटीक पक्षाचं बहुमत असल्यामुळे, सभागृह नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी महाभियोग प्रस्ताव बहुमताने मंजूर केला होता. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून मनमानी करतात. मात्र अध्यक्षाला घटनात्मक संरक्षण असल्यामुळे ट्रम्प यांच्याविरुध्द काहीच करता येत नव्हतं. मात्र युक्रेनसंदर्भातील पुरावे बाहेर आल्यानंतर ट्रम्प यांना धडा शिकवला पाहिजे असं डेमोक्रॅटीक सदस्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांच्याविरुध्द महाभियोग प्रस्ताव आणला गेला.

महाभियोगाचा निवडणुकीवर परिणाम

हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता ४९ टक्क्यांवर आली आहे. गॅलप या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे. अध्यक्ष झाल्यापासून आतापर्यंत ट्रम्प यांचं सर्वात मोठ रेटींग आहे. त्यामुळे महाभियोग प्रस्तावामुळे ट्रम्प हे राजकीय अडचणीत आले आहेत, असं म्हणता येणार नाही.

उलट या विजयामुळे ट्रम्प यांच्यासाठी दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी दावेदारी करणं सोपं होणार आहे. दुसरीकडे २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. डेमोक्रॅटीक पक्षाच्या आयोवा प्रांतासाठी झालेल्या प्राथमिक निवडणुकीसाठी मतदान झालं. मात्र याचे निकाल यायला २४ तासापेक्षा जास्त अवधी लागला. डेमोक्रॅटीक पक्षाने घातलेल्या या गोंधळाचा फायदा उचलण्याचा प्रयत्नही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय.

ट्रम्प यांच्या जमेच्या बाजू

ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकन अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली. देशातील बेरोजगारीचा दर खाली आला. देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. सोबतीला इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी मारला गेलाय, या ट्रम्प यांच्या जमेच्या बाजू ठरणार आहे.

ट्रम्प यांच्या नकारात्मक बाजू

ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून अमेरिका दुभंगली गेलीय. अनेक विषयांवर वादग्रस्त विधान करणे, मनमानी निर्णय घेणे हा ट्रम्प यांचा स्थायी भाव आहे. ट्रम्प यांच्या लहरी स्वभावामुळे आतापर्यंत त्यांचे चार सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र सचिव, अटोर्नी जनरलपासून ते त्यांचा व्हाईट हाऊसचा स्टाफ वारंवार बदलला आहे.

अनेक आंतराष्ट्रीय वाणीज्य करार त्यांनी मोडले आहेत. वातावरण बदलाच्या करारापासून अमेरिकेनं माघार घेतली आहे. त्यामुळे अमेरिकन जनता यावेळी ट्रम्प यांना पुन्हा संधी देते की घरी बसवते ते दहा महिन्यानंतर होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीतच समजणार आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/854157488392269/?t=2

Updated : 6 Feb 2020 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top