#Lockdowneffect- बांबू उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक अडचणीत

70

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू उत्पादक आणि व्यावसायिक सध्या चिंतेत आहेत कारण लॉकडाऊनपूर्वी तोडून तयार करुन ठेवलेला २ हजार ट्रक बांबू माल सध्या पडून आहे. सध्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात हा बांबूचा माल पडून आहे. गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये इथल्या बांबूला सर्वाधिक मागणी असते. तसंच माणगा जातीच्या बांबूला मोठी मागणी असते. तोडलेला बांबू वाहतूक करून बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी शेतकऱ्यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८०० हेक्टर क्षेत्रात बांबूची लागवड केली जाते. तर काही भागात नैसर्गिकरीत्या वनांमध्ये बांबू वाढतो ते क्षेत्र वेगळे आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या बांधांवरही पारंपरिक बांबू लागवड होत असते. या सर्व क्षेत्रातून केवळ माणगा जातीच्या बांबूचे दरवर्षी २ हजार ट्रक उत्पादव होते. जिल्ह्यात बांबूचे उत्पादन घेणारे १० हजार शेतकरी आहेत. एक एकराला दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न बांबूमधून मिळते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणारी माणगा ही बांबूची जात खासगी क्षेत्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारी महाराष्ट्रातील किंबहुना देशातील ही एकमेव बांबूची जात आहे. माणगा जातीसोबत चीवार ही दुसरी एक जात जिल्ह्यात सापडते. सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थकारण बऱ्याच प्रमाणात या बांबूच्या क्षेत्रावर चालतं. इथल्या शेतकऱ्यासाठी कधीही परतावा देण्यारं हे उत्पादन आहे.

एमआरजीएस योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सरकारने अनुदान देत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहीत केल्याने त्यांनी बांबू लागवड केली. पण आता हा बांबू पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारनं या बांबूच्या वाहतुकीला परवानगी देण्याची मागणी वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यात पडून असलेला बांबू योग्यवेळी बाजारपेठेत गेला नाही तर पावसाळा जवळ आला असल्याने बांबू उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे.