नास्तिकांची मुस्कटदाबी !

372

बहुसंख्याकवादाचा सगळ्यात मोठा बळी जर कोणी या देशात असतील तर तो आहे या देशातील नास्तिक. इथे बहुसंख्याक व अल्पसंख्याक दोंघाच्याही घरांवर, दुकानांवर, गाड्यांवर, मोहल्ल्यांवर, अंगावर आणि बोलण्यातही त्यांचा धर्म, त्याविषयीची अस्मिता, गर्व, माज, दर्शविणारी चिन्हे बटबटीत पणे मांडून ठेवलेली असतात. असं असतांनाही, एखाद्या नास्तिकाने त्याच्या नास्तिक असण्याचा साधा फेसबुक, ट्विटर वर केलेला उल्लेखही या समाजाला चालत नाही.
कुठलाही एक धर्म मानणारी व्यक्ती ही इतर धर्म व त्या धर्मातील देवाची संकल्पना, उपासना पद्धती नाकारूनच स्वतःचा धर्म मानत असते, पण म्हणून काही वेगवेगळ्या धर्मातील लोक एकत्र आल्यावर एकमेकांना अरे तू अमुक धर्माचा का आहे? माझ्या धर्माचा का होत नाही ? असा प्रश्न विचारात नाहीत.

पण सर्व धर्मांना व देवांना नाकारणाऱ्या नास्तिकाला मात्र तू देव का मानत नाही? हा प्रश्न हमखास विचारला जातोच (म्हणजे तू चुकीचा आहे व देव न मानणे हा पर्यायच उपलब्ध नाही).
पण आस्तिकांकडून होणाऱ्या या भेदभावापेक्षा अधिक दुःखद आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्या कडून होणारा भेदभाव .
हा भेदभाव मुख्यतः दोन प्रकारे होतो, एक तर नास्तिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबून व दुसरे म्हणजे नास्तिकांना अनुल्लेखाने मारुन.

जरा कोणी आपले नास्तिकत्व मोकळेपणे व्यक्त करायला लागले तर सुधारणावादी लोक लगेच “एवढा आक्रमकपणा बरा नाही, लोक दुरावतात” असा सल्ला देतात. बहुतेकदा हा सल्ला देणारे स्वतः नास्तिक असतात व त्यामागे त्यांची आपुलकीची व काळजीची भावना असते. या बाबतीत वाद नाही पण या प्रेमळ सल्ल्या बरोबरच आपण नास्तिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा पण दाबतो आहे. याची पुसटशी जाणीवही त्यांना नसते.
नास्तिक मेळावे घेतो, संघटना करतो म्हटलं की लगेच “अशा पद्धतीनं नास्तिकांचाही धर्म होईल” असा आक्षेप घेतला जातो. इतर अल्पसंख्यांकांवर काहीही अन्याय झाला. तर त्याविरुद्ध बरेच काही बोलले, लिहिले जाते. सेक्युलर, सर्वधर्म समभाववाल्या संघटना रस्त्यावरही येतात.

पण, ज्या नास्तिकांची मुस्कटदाबी त्यांच्या घरापासूनच सुरु होते. त्याविषयी कुठलीच सेक्युलर, सर्वधर्म समभाववाली संघटना काहीही बोलत नाही. रस्त्यावर उतरणे तर दूरच.
नास्तिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी इतकंच गंभीर आहे. त्यांना अनुल्लेखाने मारणं, आज अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर बोलणारी कुठलीही व्यक्ती, संस्था, संघटना, पक्ष नास्तिकांचा साधा उल्लेखही आपल्या बोलण्यात करत नाहीत. कन्हैय्याचा अपवाद वगळता कोणाच्याही भाषणात हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई, बुध्दिष्ट यांच्या बरोबरीने नास्तिकांचा उल्लेख माझ्यातरी बघण्यात नाही. यांच्या लेखी नास्तिक एकतर अस्तित्वातच नाहीत किंवा नास्तिकांचे कुठलेच प्रश्न नाहीत.

आता NRC, CAB च्या निमित्ताने काही जण बांगलादेशी नास्तिकांच्या प्रश्नाचा उल्लेख करतांना दिसत आहेत, पण त्यामागेही कारण नास्तिकांच्या मानवी हक्काच्या काळजी पेक्षा या वादात त्यांच्या नास्तिक ही ओळख वापरण्याची अपरिहार्यता जास्त आहे.
या देशातील संविधानाला अपेक्षित असणाऱ्या पद्धतीने जर सर्वात जास्त कोणी जगत, वागत असेल तर ते या देशातील नास्तिक, पण हेच नास्तिक या देशातील लोक, संस्था, संघटना, पक्ष यांच्या लेखी अस्तित्वातच नाही.
शेवटी, एकच सांगावेसे वाटते. नास्तिकांना व त्यांच्या प्रश्नांना वगळून जर कोणी स्वतःला सेक्युलर म्हणत असेल तर तो नैतिक अधिकार त्यांना नाही