Home > News Update > कोरोनाची कळ - या भयपर्वाची सांगता कधी ?

कोरोनाची कळ - या भयपर्वाची सांगता कधी ?

कोरोनाची कळ - या भयपर्वाची सांगता कधी ?
X

करोना आणि कोविड19 तसंच त्या भोवतीच्या सामाजिक ,आर्थिक, राजकीय, वैद्यकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहता हा एक मोठा गुंता झाला आहे. सध्या अनेकजण विचारतायत हा लॉकडाउन कधीपर्यंत चालेल? करोना वर औषध येईल का? करोनाची पॉझिटिव्ह संख्या वाढत चालली आहे आता काय?

तर हा करोनाचा भयगंड अजून आपल्या मानगुटीवर किती काळ राहणार ? उत्तम वाचक, तज्ञ डॉक्टर , research वैज्ञानिक या पैकी कित्येकांशी बोलल्यावर हळूहळू आता काही ठोकताळे निश्चित करायची वेळ आली आहे असं ठामपणे वाटतं आहे.

लॉकडाऊन 5 कसा असेल ? पुढे काय ? शाळा महाविद्यालयं कशी चालणार ? मास्क असतील का चिल्लर पार्टीला ? इतक्या लहान वयात ते कितपत शिस्त पाळतील? असे अनेक प्रश्न.

दुसरीकडे रेड झोनचं काय होणार ? मुंबईत लोकल आणि इतर पब्लिक ट्रान्सपोर्ट किमान अत्यावश्यक सेवा सुरू होणार का? आता हे सगळं येऊन आदळले आहे ते माध्यमांतून. माध्यमातून करोना युद्ध, भीती, विळखा ( काय अजगर आहे कां?), जग भयंकरच्या दरवाजात वगैरे सगळं ….एकीकडे काळोख खोल दूर रंगवला गेलाच आहे. आता हे चालू असतांना हजारो बेड्स, व्हेंटिलेटर ,सूटपासून ते विविध औषधांचा साठा, हॉस्पिटलमधली अनागोंदी ( ती मोठ्या प्रमाणात आहे बरं का? त्यात सगळी सरकारं जशी फेल आहेत तसे खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठा घोळ आहेच) डॉक्टर आणि पोलीस या सगळ्या युद्धात लढतोय हे कुणीही नाकारू शकणार नाही.

हे सगळं सूरु असताना एक विशिष्ट प्रकारची अत्यावश्यक अर्थव्यवस्था सुरू आहेच. दुसरीकडे दुय्यम अर्थव्यवस्था गाशा गुंडाळून अदमास घेत बसलीये. एक अज्ञात , मोठी ताकदवर अर्थव्यवस्था याच काळात कुठे तरी आपलं अस्तित्व आणि आपली पकड दाखवायला दबा धरून बसली आहे. ती कदाचित निसर्ग स्नेही पेहराव करून येईल, कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आय.टी. ब्रॉडबँडचं नवं कॉन्व्हर्जेन्स घेऊन येईल, तो कदाचित फार्मा कंपन्या आणि इन्शुरन्सचा नवा पेहराव घालून येईल किंवा एखादा युद्ध पोशाख ,बायो वॉर वगैरेंच्या नव्या आर्थिक परिभाषेत येईल. मी हे एक निरीक्षण करतोय या लॉकडाऊनच्या परिस्थितीचं.

एक जाणवतं आहे, या स्थितीत कुणीही ठाम नाही. विचारांचा पतंग उडवत बसणें अशी ही अवस्था आहे. हा हत्ती आपण पूर्ण बघू शकत नाही आहोत, हे पहिल्यांदा मान्य करायला हवं. जग, उपखंड, देश, राजकारण ,केंद्र राज्य, प्रशासन, अर्थव्यवस्था आणि विविध प्रसार माध्यमं आणि त्यात शेवटी माणूस एक एकटा घटक...अशी ही साखळी सुरुवातीपासून भीतीच्या दोऱ्यात कुणीतरी मस्त ओवली आहे. हे अशासाठी स्पष्ट करतोय, की पुढे ,तज्ञांना विचारल्यानंतर अनेक प्रश्न उभे राहिलेत माझ्या मनात, त्यांची उत्तरं आपल्याला जितकी लवकर आपण स्वतः च्या पातळीवर मिळवू तितके लवकर आपण या भीती पर्वामधून मुक्त होऊ.

भयग्रस्त कोण कोण आहेत ?

राजकीय व्यवस्था

अर्थव्यवस्था

आरोग्य व्यवस्था

प्रशासन

श्रीमंत / सामान्य माणूस

हे आता एक पूर्ण दुष्टचक्र झालं आहे. हा करोना विषाणू ~ प्रत्येक ठिकाणी 3 महिने फार तर धुमाकूळ घालून काढता पाय घेतो. जगाच्या तुलनेत ,भारतात मृत्य दर कमी आहे त्यावर सध्या अनेक दावे होत आहेत, पण संशोधन नाहीये. कदाचित सप्टेंबरमध्ये आपल्या सगळ्यांना वाटेल अरेच्चा हा कुणीतरी अचानक येऊन आपल्याला उगीच भो sss करून गेलं होतं की काय ? आणि आता सगळं एकदम All is Wellचं गाणं कसं बरं वाजतंय ?? आपण काय करू तेव्हा?? आपण सगळेच विषाणू, जिवाणू, व्हेंटिलेटर, हाड्रॉक्सी क्लोरोफॉर्म , आयुष्य औषधं , सोशल distancing तज्ञ झालो. म्हंटल तर पार येड्याचा बाजार झाला. त्याची असंख्य उदाहरणं आस पास आहेत.

काही तज्ञांसोबत चर्चा करताना पडलेले प्रश्न पुढील प्रमाणे

#अमेरिकेत मृत्यदर जास्त का ? भारतीयांचं TB किंवा BCG लसीकरण आणि एका मोठ्या व्हायरल आणि बॅक्टरीयल स्पेक्टरमला आपण नेहेमीच सामोरे गेल्यामुळे आपल्यात antibody प्रतिजैविकांचा काही तोटा नाही. म्हणून इथे मृत्यू दर कमी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याकडे राडा कमी झाला आहे.

#करोना ची लस येतेय म्हणून ज्या बातम्या येतात आणि जातायत त्या पूर्णपणें फोकनाड आहेत का ? तर हो तशी परिस्थिती आहे, लोक उगीच त्या प्रतीक्षेत आहेत. हा विषाणू कमालीच्या वेगाने बदलतो, दर आठवड्याला बदलतो, आता सुरू असलेलं लसीचं काम जानेवारीतल्या स्ट्रेनवर सुरू आहे, ती लस जरी आली, तरी हा हिरो आता तो मी नव्हेच असं म्हणण्याच्या स्थितीत असेल. त्यामुळे लस जशी फ्लूवर आली नाही तशी यावर परिणामकारक येईल असं मानणं हे चुकीचं ठरणार नाही. विसराच की तोपर्यंत आपण बसून राहू ,आणि सुरक्षित राहू.

# सध्या कॉविड19 वर औषध काय ? काहीच नाही हे उत्तर आहे. जे सुरू आहे ते सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट आहे. म्हणजे अंदाजपंचे दाहोदरशे .

# अनेक तज्ज्ञांचं ठाम म्हणणं आहे की ...अमेरिकेत आणि इतर काही देशात विमा कंपन्या , मेडिकल ट्रीटमेंट एसओपी आणि संबंधित कठोर कायदे यामध्ये एक टप्पेवार कार्यप्रणाली आहे. ती जर डॉक्टरांनी नाही पाळली तर डॉक्टरची कायदेशीर वाट लागते, अशामुळे व्हेंटिलेटरवर चढवणे हा एक मोठा सोपा मार्ग तिथे अवलंबला जातो, ज्यामुळे मृत्यू दर जास्त आहे.

आपल्याकडे यावेळी सुदैवाने म्हणावं की काय व्हेंटिलेटर कमी आहेत, ते चालवता येणारे आणि कुशलतेने हाताळू शकणारे तज्ञ डॉक्टर अत्यल्प आहेत.

# करोना असो की इबोला विषाणू किंवा इतर जिवाणू, ही एक परजीवी व्यवस्था आहे आणि ती निर्माण होते तेव्हा होस्ट म्हणजे प्राणी म्हणजे आपण यांना जगवून टिकून राहू शकते. ती पूर्णपणे होस्टला संपवत नाही. जर होस्ट संपला तर ते संपतात, जर असं गृहीत धरलं की हा कुण्या नतद्रष्ट मानवाने ,देशाने, कंपनीने बनवलेला आहे, तरी त्याचं अस्तित्व सतत उत्क्रांत होत रहाणं हा उद्देश त्याच्या संरचनेत अपेक्षित आहे, नैसर्गिक किंवा कृत्रिम. जर कृत्रिम असेल तर तो फार तर एका नियंत्रित वेळेत ,विहित महिन्यात आपली अपेक्षित मरतुकीचे टार्गेट करून संपूनच जाईल. तो मग दीर्घकाळ नाही राहणार. आणि त्याला या विश्वातील उत्क्रांती मध्ये टिकायचं असेल तर तो अधिक होस्ट फ्रेंडली होत जाईल. म्हणजे त्याची ताकद कमीत कमी इजा पोहोचवत जाईल. कदाचित हाच न्यू नॉर्मल फ्लू असेल नव्या जगाच्या जडणघडणीत.

# या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सगळे ,पहिल्यांदा या लॉकडाऊन काळात भीतीच्या पर्वातून बाहेर येणं गरजेचं आहे. मरण अटळ आहे. येणाऱ्या काळात राजकीय व्यवस्था या सर्व गोंधळात आपापले रंग उडवून धुरळा करतीलच, माणसाच्या जगण्याच्या सगळ्या आर्थिक आव्हानांचा सुद्धा येणाऱ्या काळात भयानक राजकारण करून चोथा केला जाईल. येत्या काळात म्हणूनच असुरक्षित मानसिकतेतली राजकीय व्यवस्था ,सरकारं काय करतात? किती धाडसी निर्णय घेतायत? ते घेतांना ठराविक लॉबीला लाभदायक निर्णय घेतायत का? की जनसामान्यांना या भीतीतून बाहेर काढून काही काम देतायत? रोजगार निर्माण करतायत? समाजात फिरणं सामान्य करण्यासाठी प्रयत्न करतायत हे पाहणं अगत्याचं ठरेल.

आपणासाठी नवा ज्ञान मार्ग देणारी नवी राजकीय लिडरशीप त्यासाठी आवश्यक आहे. ती सगळ्या पक्षात असायला हवी आहे. करोनाच्या या भय पर्वातून आधी बाहेर येऊयात.

मास्क, ग्लोवस, सॅनिटायझर , शारीरिक अंतर , हे सगळं पाळूच पण हे भयानक भय पर्व संपवूयात !

यासाठीच आपण सुज्ञ माणूस म्हणून जगणें, या सगळ्यांवर प्रतिक्रिया देतांना आपला तोल आपणच सांभाळायला शिकणं , हे तुमच्या माझ्या समोरचं येत्या काळातलं आव्हान असणार आहे.

- मंदार फणसे

Updated : 29 May 2020 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top