LockDown: मध्ये शेतकरी ते ग्राहक थेट, विक्रीचा किफायतशीर ‘औरंगाबाद पॅटर्न’

शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची किमया औरंगाबादच्या कृषी विभागामार्फत लॉकडाऊनच्या काळात करण्यात येते आहे. कृषी विभागाच्या आवाहनाला शेतकरी, शेतकरी गटासह औरंगाबादकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा प्रतिसाद म्हणजे लॉकडाऊनपासून आतापर्यंत शेतक-यांनी पाऊन कोटींहून अधिक म्हणजेच 82 लाखांचा भाजीपाला, फळे औरंगाबादकरांना विकली आहेत. दर्जेदार आणि थेट शेतातून येणा-या शेतमालामुळे औरंगाबादकर आणि मालाला मिळत असलेल्या योग्य दराबद्दल शेतकरी, असे दोघेही मोठ्याप्रमाणात समाधानी आहेत.

‘कोरोना स्वत:हून पसरत नाही, लोक त्याला पसरवतात. याला पसरवायचे थांबवायचे असेल तर लोकांनी फिरणे बंद केले पाहिजे. लोकांचे फिरणे थांबले, की कोरोनाचा प्रसार थांबतो, यामुळे संसर्ग होत नाही. तर लोकहो, घरीच थांबा आणि कोरोनाला हरवा… यासाठी शेतकरी गटामार्फत सोसायटी, कॉम्पलेक्स, वसाहतीत भाजीपाला, फळे घरीच मागवा व कोरोनाचा प्रसार थांबवा. लगेच शेतकरी गटांना संपर्क करा,’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.तुकाराम मोटे यांनी समाजमाध्यमांमधून जिल्ह्यात केले.

यामागे त्यांचा हेतू असा, की लॉकडाऊनमध्ये ग्राहक आणि शेतकरी दोघेही अडचणीत आहेत. शहरात भाजीपाला, फळे येण्यासाठी अडचण आहे. खेड्यापाड्यापर्यंत वाहने बंद झालेली आहेत. मग यातून मार्ग काढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायला हवा. तेव्हा शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांना, गट यांना एकत्र‍ित आणण्याचे ठरवले. त्यातून शेतकरी आणि ग्राहक या दोघांचाही फायदा होईल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या आवाहनाला वसाहतीतील ग्राहकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. या कामात त्यांना जिल्हाधिकारी उदय चौधरी, सहकार वसाहती संघाचे अध्यक्ष श्री. फ्रान्सिस व सहकार विभागाचे मोलाचे साहाय्य लाभले. शेतक-यांचा भाजीपाला, फळे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विभाग यशस्वी झाला, अन् शेतक-यांनाही थेट ग्राहक मिळाला. दोन्ही वर्गाचाही फायदा झाला. तसेच लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून शेतक-यांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना मिळाली. ग्राहकही समाधानी झाले.

दिवसेंदिवस आवाहनाला प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली. विचारपूस वाढली. मग कृषी विभागानेच या संकल्पनेला कृतीची जोड देत थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पना लॉकडाऊन काळात राबविण्यास सुरुवात केली. 29 मार्चपासून संकल्पना कृतीत उतरली. सुरूवातीला केवळ 40 शेतकरी, शेतकरी गटांनी पुढाकार घेतला. तर हीच संख्या महिनाभरात 64 वर पोहोचली. सर्वांची मिळून सरासरी दररोज चार ते साडेचार लाखांची भाजीपाला व फळांची विक्री होते आहे. एका महिन्यातच सव्वा लाखांहून अधिक किलो भाजीपाला आणि दोन लाखांहून अधिक किलो फळे शेतकरी, शेतकरी गटांनी विकली आहेत. याची किमत 82 लक्ष 69 हजार 470 रुपये एवढी आहे. याचाच अर्थ पाऊन कोटीहून अधिक रुपयांचा भाजीपाला आणि फळे थेट शेतकरी गटांकडून औरंगाबादकरांनी खरेदी केली व लॉकडाऊनचे पालनही शिस्तीत केले आहे.

शेतकरी गटांना इंडियन फार्मर्स फर्टीलाइजर को ऑपरेटिव्ह (इफको) कंपनीकडून सुरक्षा कीट देण्यात आल्या. यामध्ये शेतकरी गटाबरोबरच ग्राहकांच्याही सुरक्षेची काळजी घेण्याचा कंपनीचा उद्देश होता. या सुरक्षा किटमध्ये सॅनिटायझर, मास्क, हातमोजे व क जीवनसत्वाच्या गोळ्यांचा समावेश होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर गटांच्या काही प्रतिनिधींना कीट वाटप करण्यात आल्या. यामुळे ग्राहकांपर्यंतही शेती उत्पादित माल स्वच्छ व दर्जेदाररित्या पोहोचण्यास मदत झाली. शेतक-यांचीही काळजी अशाप्रकारे घेण्यात आली.

पैठण तालुक्‌यातील कुतुबखेड्याचे 32 वर्षीय अशोक नजन यांनी कुतुबखेडा ते औरंगाबाद असा 85 किलो मीटरचा प्रवास करत औरंगाबादमध्ये भाजीपाला व फळे विक्री केली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या गावातील अन्य दोघां जणांची साथ मिळाली. तिघांनीही आपापसात चर्चा करून भाजीपाला, फळांची विक्री औरंगाबादमध्ये केली. आम्ही गावात उत्पादित केलेला भाजीपाला व फळे विकत आहोत. धावपळ होते, पण विक्री करण्याचा अनुभव आणि ग्राहकांसोबत होत असलेला संवादातून उत्पादक ते ग्राहक जोडण्याची मोठी संधी यातून मिळाली. आम्हाला आता खात्री झाली आहे, की शेतीतील भाजीपाला व फळे विक्रीची हीच चांगली व योग्य पद्धत आहे, असे नजन म्हणाले.

तर त्यांचे दुसरे सोबती ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. एका ग्राहकाने 10 रु कमी दिले असे ग्राहकाच्याच लक्षात आले, त्या ग्राहकाने लगेच 10 रु परत आम्हाला आणून दिले. संकटाच्या काळात ग्राहकाकडून शेतक-यांना अशा उपक्रमातून मोठा दिलासाच मिळाला. या कामासाठी पैठण तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची मोलाची मदत झाली आहे, असे 25 वर्षीय तरुण शेतकरी आप्पासाहेब जाधव म्हणाले.

शेतक-यांचा थेट माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची किमया या शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून झाली. त्याला कृतीची जोड मिळाली. परंतु याबरोबरच कृषी विभागाने या उपक्रमाची गरज असल्याची माहिती सर्वदूरपणे पोहोचवली. पूर्वतयारी म्हणून या अनुषंगाने करावयाच्या सर्व उपाययोजना केल्या. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केला. शेतक-यांनी ऑर्डर कशा पद्धतीने घ्यावी, समाजमाध्यमांचा कसा वापर करावा, ग्राहकांशी संवाद कसा साधावा, शेतकरी गट, कंपन्यांची जबाबदारी, गट कंपन्यांसाठी आचारसंहिता ठरवून देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने सोशल डिस्टन्स ठेऊन भाजीपाल्यांची विक्री करावी. रोडवर बसून भाजीपाला विकू नये.मालाची पॅकिंग करताना व विक्रीवेळी चेह-यावर मास्क घालावा, हातात हँड ग्लोज घालावे, सॅनिटायझरचा वेळोवळी वापर करावा.

वाहनास आरटीओ कार्यालयाची परवानगी घ्यावी. सायंकाळी घरी गेल्यावर आंघोळ करावी व कपडे धुवून टाकावेत, आदी प्रकारची आचारसंहिता ठरवून दिली. ठरवून दिलेल्या या आचारसंहितेच्या मार्गाने शेतक-यांनी, शेती उत्पादक कंपन्यानी विना दलाली, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत लॉकडाऊनच्या काळात लाखो रूपयांचा भाजीपाला, फळे विक्रीपर्यंत मजल मारली आहे, हा कृषी विभागाचा उपक्रम स्तुत्य अशा प्रकारचाच आहे. यामध्ये कृषी विभाग व आत्मातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.

– श्याम टरके, औरंगाबाद