कंगना रानावतविरोधात हक्कभंग, निषेधाचा ठराव

331

गेले काही दिवस अभिनेत्री कंगान रानावतने सातत्याने मुंबई, मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचे तीव्र पडसाद विधिमंडळ अधिवेशऩात उमटले. काँग्रेसने कंगना राणावत तिच्या विरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हा प्रस्ताव मांडला. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान कंगनाने केला आहे अशा महिलेच्या विरोधात हक्कभंग आणत असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले आहे.

तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत कंगना रानावतच्या निषेधाचा ठराव मांडला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्र्यांकडे कंगनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. कंगनाने केलेल्या वक्तव्याच्या सर्व पक्षांनि निषेध केला पाहिजे अशी भूमिका गृहमंत्र्यांनी मांडली.

तसंच ड्रग्ज प्रकरणी कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.कंगना रणौतचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. त्याने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते. त्यामुळे या प्रकरणी आता मुंबई पोलीस चौकशी करतील असंही अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

Comments