Home > News Update > मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला पाकमध्ये तुरूंगवास

मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला पाकमध्ये तुरूंगवास

मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला पाकमध्ये तुरूंगवास
X

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याला पाकिस्तानमधल्या कोर्टानं अकरा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या दोन प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने कोर्टानं हाफीज सईदला साडे पाच वर्षांच्या दोन वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या आहेत.

तसंच दोन्ही प्रकरणात १५ हजारांचा दंडही ठोठावला आहे. पण या दोन्ही शिक्षा त्याला एकाचवेळी भोगाव्या लागणार आहेत. हाफीज याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर अमेरिकेनंही त्याच्यावर १० मिलियन डॉलरचं बक्षीस जाहीर केले होते.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद होता. भारताने त्याच्याविरोधातील सर्व पुरावे पाकिस्तानला सोपवल्यानंतरही पाकने त्याला अटक केली नव्हती. पण संयुक्त राष्ट्राने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याला गेल्यावर्षी जुलैमध्ये अटक केली होती.

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या खटल्यात सईद विरोधात सरकारी वकिलांनी २० साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती. यात हाफीज सईदच्या साथीदारांनी कशाप्रकारे दहशतवादी हल्ल्यांसाठी आर्थिक रसद पुरवली याचीही माहिती या साक्षीदारांनी दिली.

पाकमधल्या पंजाब प्रांतात हाफीज सईद आणि त्याच्या साथीदारांविरोधात २३ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. हाफीजला सध्या लाहोरमधल्या कोट लखपत जेलमध्ये कडेकोट सुरक्षेत कैदेत ठेवण्यात आले आहे.

Updated : 12 Feb 2020 12:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top