Home > News Update > मुलांसाठी शाळा हवी की मैदान, या वादात अडकलं गोवंडीचं आंबेडकर मैदान

मुलांसाठी शाळा हवी की मैदान, या वादात अडकलं गोवंडीचं आंबेडकर मैदान

मुलांसाठी शाळा हवी की मैदान, या वादात अडकलं गोवंडीचं आंबेडकर मैदान
X

मुंबईतील गोवंडी-शिवाजीनगर या भागात गीता महाविद्यालय ही १९७८ पासून सुरु केलेली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. गीता विद्यालयाच्या संचालक मंडळाने महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाची जागा अडवून अवैध बांधकाम केल्याचा आरोप आहे. मैदानाच्या या वादामुळे शिवाजीनगर परिसरात मुलांसाठी शाळा हवी की मैदान असा पेच निर्माण झाला आहे. अनेकदा मैदानासाठी स्थानिकांनी शाळेविरोधात आंदोलनही केली आहेत.

२०१७ साली या शाळेच्या परिसराची महानगरपालिकेने तपासणी केली. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काही जागा ही पालिकेची आहे असं निष्पन्न झालं. पालिकेच्या त्याच जागेवर गीता विद्यालयाने १० वर्ग पत्र्याच्या स्वरूपात बांधले आहेत. महानगरपालिकेने आपली जागा त्वरित ताब्यात घेऊन तेथून शाळा हटवावी आणि मुलांसाठी खेळाचं गार्डन बांधण्यात यावं अशी मागणी समाजवादी कार्यकर्ते आणि रहिवासी करत आहेत.

शाळेचे संचालक किशन अवसारी यांनी “आमची शाळा सरकारमान्य असुन १९७८ सालापासून आम्ही चालवत आहोत. महापालिकेकडून ही जागा आम्हाला मिळणार आहे. २०१७ मध्ये आलेल्या नवीन डेव्हलपमेंट प्लॅननुसार ती जागा मैदान म्हणुन दाखवली जात आहे. आम्हाला हे माहिती नव्हतं. समाजवादी नेतेचं सतत याचा विरोध करत आहेत. परंतु महानगरपालिकेने कोणतीही कारवाई आमच्यावर केली नाही. तसचं शिवाजीनगर भागात भरपुर खेळाची मैदान आहेत पण शाळा नाहीत.” अशी आपली बाजू मांडली आहे.

समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते इम्रान खान यांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’शी बोलताना सांगितलं की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान गोवंडी भागातील एकमेव खेळाचं मैदान असल्यामुळे त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे शाळा सुरु करणं योग्य आहे का? या संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नगरसेवक आयेशा खान यांच्या मदतीने आम्ही शाळेवर कारवाई करण्यात यावी अशा स्वरुपात विनंती अर्ज देखील दिला आहे.”

संबंधित घटनेबद्दल आम्ही महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारले असता, “मुळातच ती शाळा पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. तेव्हा रिझर्व्हेशन प्लॉटिंग नव्हतं. २०१७ मध्ये रिझर्व्हेशन प्लॉटिंग झालं, त्यामुळे पालिका विचार करुन निर्णय घेईल. उर्वरित प्लॉट हा विकसित करण्यात येईल. गोवंडी-शिवाजी नगर या भागात आठवी-नववीचे वर्ग देखील कमी आहेत. त्यामुळे त्याचा विचार करणे गरजेचं आहे. त्या शाळेतील काही विद्यार्थी I.A.S. ऑफिसर झालेले आहेत, तर कोणी नगरसेवक झाले आहेत.” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Updated : 23 Dec 2019 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top