Home > News Update > महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजना कोरोनाबाधीतांसाठी वरदान! लाखो कोरोना बाधीत रुग्णांवर मोफत उपचार...

महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजना कोरोनाबाधीतांसाठी वरदान! लाखो कोरोना बाधीत रुग्णांवर मोफत उपचार...

महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजना कोरोनाबाधीतांसाठी वरदान! लाखो कोरोना बाधीत रुग्णांवर मोफत उपचार...
X

मुंबई, दि.२९: राज्यातील सर्व जनतेला मोफत उपचाराची सुविधा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार कोरोनाबाधीतांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधीतांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून कोरोना काळात कर्करोग, ह्रदयविकार, किडनी विकाराच्या तब्बल १ लाख ४१ हजार ५७८ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत.

राज्यात या योजनेत सहभागी असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये दि. २५ जूनपर्यंत १ लाख ९८५ कोरोनाबाधींतावर मोफत उपचार करण्यात आले. या काळात खासगी रुग्णालयात १८ हजार २२८ तसेच केंद्र शासनाच्या, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या आरोग्य केंद्रात २७७८ असे एकूण १ लाख २१ हजार ९९१ रुग्णांवर उपचार झाले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील सामान्य रुग्णांना जीवनदायी ठरत असून मोठ्या खर्चाचे वैद्यकीय उपचार तेही मोफत घेणे या योजनेमुळे शक्य झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने दि. २३ मे रोजी या योजनेची व्याप्ती नव्याने वाढवली. राज्यातील सर्वांचाच समावेश योजनेत करण्यात आला. पांढरी शिधापत्रिका असलेल्या लोकांनाही या योजनेंतर्गंत ३१ जुलैपर्यंत लाभ घेता येणार आहे. योजनेचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

जनारोग्य योजनेचा विस्तार करताना त्यात सहभागी रुग्णालयांची संख्या ४५० वरून १००० करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त उपचारांचा लाभ घेता येईल यासाठी या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी नव्याने निविदा काढतांना ज्या आजारांचा लाभ फारच कमी लोक घेतात असे आजार काढून या योजनेत नवीन आजारांचा समावेश केला. विशेष म्हणजे महापालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयात गुडघे बदल शस्त्रक्रियेसह १२० प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याची योजना यात सहभागी करून घेण्यात आली.

या योजनेसंदर्भात तसेच नजिकच्या सहभागी रुग्णालयांविषयी अधिक माहितीसाठी योजनेच्या २४ X७ सुरू असणाऱ्या १५५३८८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी कले आहे.

Updated : 30 Jun 2020 1:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top