राजीव युग आणि तंत्रज्ञान क्रांती

इंदिरा गांधींच्या मृत्युनंतर राजीव गांधी पंतप्रधानपदी आले. त्यांच्या पक्षाने विक्रमी ४०१ जागा लोकसभेत मिळवल्या. म्हणजे जवळजवळ एकूण मतदानापैकी ४९.१७% . भारतीय जनता पक्ष आणि कम्यूनिस्ट पक्ष यांचा धुव्वा उडाला होता . ‘चालू ती वाट आणि पाडू ती वहिवाट’ हे करण्यासाठी हे मतदान उभारी देणारे होते. राजीव गांधी यांना विज्ञान –तंत्रज्ञान यात विशेष रस होता. साहजिकच त्यांनी सत्तेवर आल्या आल्या संगणक आणण्याची घोषणा केली ज्यावर भरपूर टीका झाली. संगणक आल्याने नोकऱ्या जातील हे कामगार नेत्यांचे आवडते गृहीतक होते. पण परदेशात संगणक आता पर्सनल कॉम्प्यूटर म्हणून स्थिरावला होता.पण भारतात काही मोठ्या संस्थांकडेच जसे की T. I.F. R. किवा आयआयटी अशा संस्थांकडेच संगणक होते. पण व्यक्तिगत वापरात संगणकाचा उपयोग होत नव्हता.

छोट्या संस्था किंवा कंपन्यांमध्येही तो होत नव्हता. अमेरिकेत काही वर्षापूर्वी अशीच स्थिती होती.पण apple या कंपनीने छोट्या आकारात संगणक तयार करून क्रांती तर केलीच, पण लेखक,चित्रकार,जाहिरात क्षेत्रातील मंडळी यांनीही संगणक वापरावा याप्रकारे त्यांनी जाहिराती बनवली आणि प्रसार केला. साहजिकच अमेरिका आणि इतर देशात संगणकाचा वापर वाढला आणि देशाच्या विकासात त्यांनी भर टाकली. उदाहरणार्थ बँकिंग सारख्या क्षेत्रात संगणक आल्याने प्रचंड आकडेमोड टळली.

राजीव गांधी यांनी आपल्या ड्युन स्कूलमधील अनेक मित्रांना राजकारणात आणले. त्यातील काहींना मंत्रीपद मिळाले. शिवाय अनेक तज्ञ मंडळीना देशविकासासाठी प्रोत्साहन दिले. सॅम पित्रोदा हे त्यातील एक . सॅम पित्रोदा- सत्यनारायण गंगाराम पित्रोदा दूरसंचार अभियंते, संशोधक, विकासकांचे मार्गदर्शक आणि प्रवर्तक. जन्म ओरिसा (ओडिशा) राज्यातील तितलागढ या खेडेगावात. सॅम यांचे शालेय शिक्षण गुजरातमधील आनंद वल्लभ विद्यालयातून झाले. पुढे त्यांनी बडोद्याच्या विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक या दोन विषयांमध्ये एम्.एस्सी. पदवी मिळवली. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले.

शिकागोच्या इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी विद्युत् अभियांत्रिकीमधील एम्.एस्सी. पदवी प्राप्त केली. ते १९६० नंतर काही वर्षे दूरसंचारक्षेत्र आणि छोटे संगणक (हँडहेल्ड कॉम्प्यूटर) यांविषयीच्या संशोधनात व्यग्र होते. या काळात त्यांनी प्रामुख्याने दूरध्वनी स्विचमधील मायकोप्रोसेसर यांची जगाला ओळख करून दिली. अमेरिकेतील शिकागो येथील जीटीई कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये डिजिटल स्विच तंत्रज्ञान क्षेत्रात दहा वर्षे काम केल्यानंतर लवकरच त्यांनी ‘वेसकॉम स्विचिंग’ या कंपनीची स्थापना केली (१९७४). काही काळाने ‘रॉकवेल इंटरनॅशनल’ या कंपनीत ती सामील झाल्यानंतर सॅम पित्रोदा या कंपनीचे उपाध्यक्ष बनले. १९७५ मध्ये त्यांनी लावलेल्या इलेक्ट्रॉनिक डायरीचा शोध म्हणजे छोट्या संगणकाचेच उदाहरण मानले जाते.

१९८३ मध्ये पित्रोदांनी ‘काँप्युकॉर्ड’ नावाचा संगणक-शीर्षकाचा द्विअंगी (१, २, ४, ८, …..) पत्त्यांचा खेळ, ज्यामध्ये दशांश पद्धतीचा वापर केलेला नाही असा, शोधून काढला. या साऱ्यामुळे त्यांचा तांत्रिक ज्ञानाचा पाया भक्कम होता. इंदिरा गांधींच्या आमंत्रणामुळे ते ८० च्या सुरुवातीला भारतात आले आणि राजीव गांधींसारखा तरुण पंतप्रधान येणे नंतर त्यांच्या पथ्यावर पडले.

इंडियन टेलिकॉम ही कंपनी ८० पर्यंत इलेक्ट्रोमेकनिक स्विचेस वापरत असे. टेलिफोनवरील संभाषणात खरखर, फोन नीट न लागणे याचे मूळ त्यात होते. असे स्विचेस जपान किंवा अमेरिकेतून आयात करणे हा एकच उपाय होता. पण त्या काळात यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन लागले असते, शिवाय हे स्विचेस मोठ्या संख्येनेच दळणवळण करू शकायचे. म्हणजेच १ लाख लाईन्स जिथे आहेत तिथेच त्यांचा उपयोग होता . याला दुसरा पर्याय होता तो स्वतः असे तंत्रज्ञान विकसित करून स्विचेस बनवायचे, अर्थात हे सोप्पे नव्हते .

परदेशी कंपनीकडून तंत्रज्ञान घेणे हा एक उपाय होता, पण पुन्हा पैशाचा प्रश्न होताच. एका बड्या कंपनीच्या प्रमुखाने इंदिरा गांधींना लिहले होते की, “आमच्या कंपनीने अब्जावधी डॉलर संशोधनावर खर्च केले आहेत. तेच संशोधन पुन्हा करणे शहाणपणाचे नव्हते.” पण हे आव्हान पित्रोदा यांनी स्वीकारले. त्यांनी हे काम केल C-Dotच्या माध्यमातून

हे सी-डॉट काय होते?

सिलिकॉन valleyमधल्या एका कॉम्प्यूटर बनवणाऱ्या कंपनीची ८० च्या दशकात जाहिरातीसाठीची ओळ असायची की,-“we are the dot in .com”. ही ओळ कंपनीचे इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील स्थान स्पष्ट करणारी होती. C-DOT अर्थात center for development of telemetics च्या बाबतीत जर असे स्लोगन वापरायचे झाल्यास “C-DOT is the com in Indian telecom.” भारतात telecom क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सी-डॉट ची स्थापना १९८४ ऑगस्टमध्ये झाली.सरकारी लाल फितीपासून मुक्त आणि नव्या दमाने संशोधन करणाऱ्या या संस्थेने दूरध्वनीचे जाळे सोपे केले. राजीव गांधींनी संस्थेला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिले. हे जर झाले नसते तर कदाचित भारत दूरसंचार क्षेत्रात मागासलेलाच राहिला असता.

सी-डॉटने आय .टी आणि दूरसंचार यात Sam पित्रोदा(telecom engineer) यांच्या मदतीने गावागावात दूरध्वनीचा प्रसार केला. भारतात १९८० पूर्वी २.५ दशलक्ष दूरध्वनी संच होते. त्यातील जास्त दूरध्वनी संच नागरी विभागात होते .शहरात राहणाऱ्या ७% लोकांकडे देशातील एकूण संचापैकी ५५% दूरध्वनी होते. सार्वजनिक दूरध्वनीची संख्या मात्र १२००० इतकी होती आणि वापर करणारे होते ७००दशलक्ष लोक. भारतातील ९७ % गावांमध्ये टेलिफोनची कोणतीच सोय नव्हती. जुन्या दूरसंचार प्रणालीद्वारे खेडोपाडी ही सुविधा पोचवणे अवघड काम होते.

इतर देशांमध्ये आधुनिक डिजिटल स्वीचप्रणाली यायला सुरवात झाली होती. त्याद्वारेच हे आव्हान पेलणे शक्य होते . सी-डॉटने डिजिटल स्वीचेसची निमिर्ती केली.अवघ्या तीन वर्षात C-DOTमार्फत १२८- rural exchange लाईन्स, १२८-private business exchange लाईन्स, ५१२ लाईन्सचे central exchange मग १००००लाईन्स असा विस्तार होत गेला. हे करण्यात आणखी एका संशोधनाची भर पडली.पिवळ्या रंगाचे छोटे स्वस्त बुथचे मॉडेल आयआयटी मधील एका संशोधकाने तयार केले. त्याच्या मदतीने PCO (Public call office)टेलिफोन बूथचे लोण देशभर पसरले. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली. एकूण ६००००० बूथ निर्माण झाले. ISD,STD सेवाही येथे मिळू लागल्या. श्रीमंतीचे प्रतिक असलेला फोन आता प्रत्येक भारतीयाच्या संपर्काचे सोपे माध्यम बनला. पुढे यात सुधारणा होतच राहिल्या .

केवळ दूरध्वनी नाही तर एकूण तंत्रज्ञानाच्या कक्षा भारतात रुंदावत होत्या. तंत्रज्ञान क्रांतीची दारे खाजगी व्यावसायिकांसाठी खुली रहावीत असा राजीव गांधींनी निर्णय घेतला आणि ६८० उत्पादकांपर्यंत हे तंत्र पोचले. या उत्पादकांनी ७,२३० करोड रुपयांची उपकरणे निर्माण केली. ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ३५००० जणांसाठी रोजगार संधी उपलब्ध झाली.

देशात विकासाची लाट उसळत रहावी म्हणून आवश्यक असते राजकीय इच्छाशक्ती. राजीव गांधींकडे ही इच्छाशक्ती तर होतीच शिवाय भारताला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न त्यांच्या मनात होते. त्यामुळेच हे सगळे शक्य झाले .अलीकडे एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पित्रोदा म्हणाले “टेलिकॉम क्षेत्रामुळे देशाचा चेहरा मोहरा बदलू शकतो याची मला खात्री होती पण राजीव गांधींच्या साथ लाभली आणि हे खरे ठरले .ग्रामीण टेलीकॉम विकासाचे एक आदर्श मॉडेल आम्ही तयार केले .लोकांनी त्यावेळी आम्हाला खरतर वेडं ठरवलं. पण आज आपण या बदलांमुळे झालेल्या प्रगतीचा आलेख पहिला तर तो थक्क करणारा आहे. भारत आज साडेसातशे कोटी डॉलर किमतीचे software निर्यात करतो. जे आय टी क्रांतीमुळे शक्य झाले. ”

आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे टेलिकम्यूनिकेशन मार्केट आहे. देशात ९६ कोटी मोबाईल उपभोक्ता आहेत. तसेच १३ कोटी ७ लाख यापेक्षा अधिक लोक इंटरनेट वापरणारे आहेत हा बदल घडण्यामागे अर्थात ८० च्या दशकातील राजीव गांधीनी उचललेली पावले होती.

शशिकांत सावंत