अभिनंदन! राज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी

राज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात पहिला प्लाझ्मा प्रयोग यशस्वी झाली असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी त्यांना दिली असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

सध्या दुसरा प्रयोग मुंबईच्या नायर रुग्णालयात केला जात आहे. तो देखील यशस्वी होईल अशी खात्री डॉक्टरांना आहे. असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. प्लाझ्मा थेरपीच्या गाईडलाइन्स योग्य फॉलो झाल्या तर नक्की हे यशस्वी होईल अशी माहिती परदेशी यांनी दिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

प्लाझ्मा थेरपीमध्ये विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या इतर रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य़ आक्रमणापासून वाचवतात. या रुग्णावर उपचार करण्यासाठी कोरोनामधून बऱ्या झालेल्या एका प्लाझ्मा दात्याचा शोध घेण्यात आला. या रुग्णाच्या आधी २ चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या.

तसंच प्लाझ्मा देण्याच्याआधीही पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली, ती चाचणीसुदद्धा निगेटीव्ह आली. त्यानंतर या दात्याच्या शरिरातून प्लाझ्मा घेण्यात आला. यामध्ये २ रुग्णांवर उपचार होऊ शकतात. एक दाता ४०० मिलिलीटर प्लाझ्मा देऊ शकतो. या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आल्यानंतर काही तासातच त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.