Home > News Update > कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या 2 औषधांबाबत संभ्रम

कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या 2 औषधांबाबत संभ्रम

कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या 2 औषधांबाबत संभ्रम
X

कोरोना आजाराच्या उपचारासाठी लगणारे प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधांच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे या औषधांच्या वापराबाबत कोविड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे, असे मत, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे. त्या संदर्भातली मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहीले आहे.

या पत्रात डॉ. शिंगणे म्हणतात, कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबद्दल सध्या संभ्रम आहे. या औषधाची मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित असल्याने तुटवडा भासत आहे. रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी या दोन्ही औषधांची मागणी केली जाते आहे. काही ठिकाणी ही औषधे जास्तप्रमाणात प्रिस्क्राईब केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे, कोविड रिपोर्ट येण्यापूर्वी किंवा रिपोर्ट आल्यानंतर पहिल्या दिवशीच ही औषधे प्रिस्क्राईब केलेली किंवा एकाच प्रिस्क्रीपशन वर दोन्ही औषधे मागवलेली असल्याची माहिती मिळाली आहे.

कमी पुरवठ्यामुळे औषध रुग्णाला वेळेवर मिळणार नाही या भीतीपोटी अगोदरच औषधाची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची जनतेच्या मनातील भीती व संभ्रम दूर करण्यासाठी राज्यस्तरावर नेमण्यात आलेल्या कोविड टास्क फोर्समार्फत रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब ही औषधे रुग्णाचा कोविड पॉझिटीव रिपोर्ट आल्यानंतर कोणत्या दिवशी व कोणत्या परिस्थितीत द्यावीत, तसेच ही दोन्ही औषधे एकाच वेळी रुग्णांना देता येतात का? याबाबत राज्यातील जनतेला मार्गदर्शन व्हावे यासाठी कोविड टास्क फोर्सला योग्य त्या सूचना करण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी केली आहे.

Updated : 26 July 2020 1:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top