Home > News Update > माझी आई गेली कुठं?

माझी आई गेली कुठं?

माझी आई गेली कुठं?
X

दसऱ्याच्या दिवशी आई पूजायची, खुरपे, विळे, टिकाव, फावडे आणखी काही तिची शस्त्र. जी तिला रोजच उपयोगी पडायची. खापराची पाटी कोळशानं घासून स्वच्छ केल्यानंतर आईच्या सांगण्यावरुन त्यावर लिहायचो 'श्रीगणेशाय नमः'

पाटीवरची पेन्सिल, वही, पुस्तकं आणि पेनाची पूजा करायला सांगायची आई. पेन-पाटी-पेन्सिल हे शस्र असतं, हे शाळेत न गेलेल्या आईला कोणी शिकवलं असेल?

वाटून खायचं शिकवलेल्या आईनं हातात काठी, कोयता घेऊन, प्रहार करायचा 'संस्कार' नाही दिला.

बाजरी-ज्वारीची राखण करायला शेतात जातानाही आई सांगायची पोरांनो, गोफण हळू चालवा. पाखरांना त्यांचा शेर(वाटा) घेऊन जाऊ द्या. नाहीतर ती उपाशी मरतील...

पेन-पेन्सिल(लेखनी)ला शस्र मानणारी,

निसर्गातलं पाखरांचं सह अस्तित्व समजावून सांगणारी,

माझी आई गेली कुठं?

लहान मुलांच्या हातात जेव्हा वह्या-पुस्तकांऐवजी पूजायला काठया आणि नंग्या तलवारी दिल्या जातात, तेव्हा मी भयभीत होतो अंतर्बाह्य...

कोणावर हात उगारायचा नाही, सांगायची आई. आज सभोवतीच्या आयांमध्ये मी माझ्या आईला शोधत राहतो...

दसऱ्याच्या दिवशी काठया-तलवारी पूजणाऱ्या...

रस्त्यात मारझोड करणाऱ्या...

हिंसक समूहात सहभागी होऊन खून करणाऱ्या मुलांविषयी...

त्यांच्या आयांना काय वाटत असेल?

या विचारानं अस्वस्थता पसरते मनभर...

- भाऊसाहेब चासकर

Updated : 9 Oct 2019 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top