Home > News Update > डॉ. तात्याराव लहाने यांच्या रुग्णसेवेला 25 वर्ष पूर्ण

डॉ. तात्याराव लहाने यांच्या रुग्णसेवेला 25 वर्ष पूर्ण

डॉ. तात्याराव लहाने यांच्या रुग्णसेवेला 25 वर्ष पूर्ण
X

नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या रुग्ण सेवेला 25 वर्ष पूर्ण झाली. या संदर्भात डॉ. तात्याराव लहाने यांनी फेसबुक वर एक पोस्ट लिहिली असून त्यांनी या पोस्टमध्ये त्यांनी गेल्या 25 वर्षात हाती घेतलेल्या रुग्ण सेवेचे माहिती सांगितली आहे.

नमस्कार मित्रहो. मित्रहो मी जुलै १९९४ ला सर जे. जे. रूग्णालयातील नेत्रविभागात रूजू झालो. १९ सप्टेंबर १९९४ ला. डाॅ. रागिनी पारेख या विभागात रूजू झाल्या. गेली २५ वर्ष आम्ही दोघही एकत्र काम करत आहोत. १९९४ ला नेत्रविभाग अतिशय डबघाईस आला होता. विभागात फक्त ३० रूग्ण येत असत. एक वर्षात सर्व प्रकारच्या मिळून फक्त ६०० शस्त्रक्रिया होत असत. मी खेड्यातुन आलो होतो. त्यामुळे येथील तंत्रज्ञानाविषयी मला फार माहीती नव्हती. तसंच माझ्या किडनी खराब झाल्यानं माझं डायलीसीस सुरु होतं.

माझ्या आईनं मला किडनी दिल्यानंतर हा विभाग चांगला करण्याचा आम्ही विचार केला. डाॅ. रागिनी पारेख यांनी सहभाग देण्याच्या मान्य केले. डाॅ. रागिनी मुलूंड वरूण रोज ३० किमी चा प्रवास करून सकाळी ७ ते ७.३० पर्यंत विभागात येत. विभागाचे कामकाज रात्री १० वाजेपर्यत सुरु असे. दोघांनी एकत्र काम सुरू केल्यामुळे दुप्पट काम होऊ लागले. डाॅ. रागीनीने मला येथील नवीन तंत्रज्ञान शिकवले. विभागाचे काम वाढत असताना १९९९ ला आम्ही खेड्यापाड्यात शिबीरं घेण्याचा निर्णय घेतला. तो आजतागायत सुरुच आहे. कोणतंही काम करत असताना एक माणुस करू शकत नाही. पण दोघही एकाच उद्दिष्टानी एकत्र काम करत असतील तर त्याला यश येते. डाॅ. रागिनी व मी काम करत असताना नेत्रविभागातील सर्व कर्मचारी आमच्या या यज्ञात सहभागी झाली. हा शासकीय विभाग असुनही रोज फक्त ८ तास काम न करता १० ते १२ तास काम केले जाते. याचं मोबदला कोणीही मागितला नाही. शिबीरामध्ये सर्वजन १८-१९ तास दररोज काम करतात.

डाॅ. रागिनी माझ्यापेक्षा जास्त शस्त्रक्रिया करतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त आणि वैज्ञानीक काम करणारा विभाग म्हणूण या विभागाकडे पाहीले जाते. डाॅ. रागिनी व मी एकत्र काम करत असताना खूप संकटांना तोंड दिलं. पण रूग्णसेवेला सेवेला आम्ही वाहून घेतले. डाॅ रागिनी व मला एकत्र काम सुरू करून २५ वर्ष आज पुर्ण झाली. एवढ्या काळात या विभागामार्फत तीन लाखाहून अधिक शस्त्रक्रिया केल्या. तसेच ५८७ लहान मोठी नेत्र शिबीरात जाऊन एक लाखाच्या वर शस्त्रक्रिया केल्या.

शिबीरास जातांना शनिवार, रविवार किंवा सुट्ट्यांत शिबीरात जाऊन शस्त्रक्रिया केल्या. ५० लाखाहून अधिक रूग्णांवर ऊपचार करण्यात आले. डाॅ. रागिनी यांनी वैक्तीक ८५ हजार व मी १ लाख ६३ हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. हे जागतीक ऊच्चांक आहेत. दोघांनी एकत्र काम केले नसते तर हे शक्यच झाले नसते. डाॅ. रागिनीला १०१ वर्षाचे आरोग्यदायी आयुष्य मिळो यासाठी प्रार्थना.

Updated : 20 Sep 2019 1:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top