Home > News Update > देवेंद्र फडणवीस एकटे पडलेयत का...

देवेंद्र फडणवीस एकटे पडलेयत का...

देवेंद्र फडणवीस एकटे पडलेयत का...
X

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकटे पडलेयत का असा आरोप काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आसपास सध्या इतर पक्षांमधून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांची रेलचेल असते. मूळ भाजपातील नेते मात्र त्यांच्या आसपास अभावानेच दिसतात अशी भजपामध्येही चर्चा आहे.

दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे बैठकीसाठी फडणवीस यांच्यासोबत प्रसाद लाड होते. राज्यात फिरताना ते प्रविण दरेकर यांना सोबत घेऊन फिरतात. विरोधी पक्षनेते पदासाठी इतर अनेक उमेदवार असताना बाहेरून आलेल्या दरेकर यांची निवड फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पक्षामध्ये स्वतःची टीम बांधत आहेत अशी चर्चा सुरू आहे.

पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळत नाहीय. एकनाथ खडसे पक्षाच्या निर्णयप्रक्रीयेतून बाहेर फेकले गेले आहेत. जळगावचे दुसरे संकटमोचक नेते गिरीश महाजन ही देवेंद्र फडणवीस यांच्या आसपास दिसत नाहीत.

पंकजा मुंडे किंवा विनोद तावडे यांना विधानसभा, विधानपरिषद किंवा पक्षाच्या कार्यकारिणीत आणण्याचा मानस फडणवीस यांचा दिसत नाही. नागपुर तसंच विदर्भातील गडकरी समर्थक कधीच किनाऱ्याला लागले आहेत. यशोमती ठाकूर यांनी भाजपातील आमदारच महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं विधान केल्यानंतर त्याचा समाचार घ्यायला काँग्रेस मधून भाजपात गेलेले हर्षवर्धन पाटील पुढे आले.

एकूणच भाजापातील परिस्थिती दाखवली जातेय तशी मजबूत नाहीय. कधीकाळी ऑस्ट्रेलियाच्या टीम सारखं खेळणाऱ्या भाजपाच्या टीममध्ये ही आता फूट पडलेली स्पष्टपणे दिसून येत आहे.

Updated : 19 July 2020 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top