गणेशोत्सवाबाबत अजित पवारांचं राज्यातील मंडळांना आवाहन

कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पुण्यात गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार या मंडळांचे आभार मानले आहेत. पुण्यासह राज्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल अजित पवार यांनी सर्व मंडळ सदस्यांचं अभिनंदन करत जाहीर आभार मानले आहेत.

राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही या निर्णयाचं अनुकरण करतील, असं आवाहन त्यांनी केले आहे. सार्वजनिक उत्सव साधेपणानं साजरा करत असताना महापालिका आणि पोलिस यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करण्याचा घेतलेला निर्णय आणि पुण्यातील सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींनी दाखवलेलं समाजभान कौतुकास्पद आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असंही अजित पवार यांनी म्हटले आहे.