तानाशाह असे जातात…!

Death of Dictator Benito Mussolini and Dictator Hitler last time
Courtesy: Social Media

बेनिटो मुसोलिनी आणि हिटलर… लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या दोन हुकुमशहांच्या शेवटच्या क्षणी नक्की काय झालं? तुम्हाला माहिती आहे का? नक्की वाचा या गणेश विसपुते यांनी या दोन तानाशाहांच्या शेवटच्या क्षणाचं केलेलं वर्णन
बेनिटो मुसोलिनी पराकोटीचा लंपट होता. “केवळ बलात्कारातूनच मला स्त्रीसुख मिळतं”, असं तो त्या बायकांनाही सांगत असे. तरीही असंख्य बायका त्याच्यावर फिदा होत्या. तशी शेकड्यानं त्याला रोज पत्रं मिळत होती. क्लारा पेटॅसी ही विशीतली तरूणी त्याच्याकडे अशीच आकर्षित झालेली होती. पत्रं लिहिणाऱ्या आणि आकर्षित झालेल्या मुलींना तो लक्षात ठेवत असे. त्या रासवट लंपटकथा रिचर्ड बॉस्वर्थ या पेटॅसीच्या चरित्रकारानं तपशिलात लिहिलेल्या आहेत.

समाजाला दाखवण्यासाठी क्लाराचं लग्न लावलं गेलं. पण तिच्या नवऱ्याला मुसोलिनीनं जपानला पाठवलं. क्लारा त्याच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहिली. पण शिवाय रोज अनेक स्त्रियांचा सहवास त्याला गरजेचा वाटे. ती वर्णनं तो तिलासुद्धा ऐकवत असे.

सर्वसत्ताधीश असलेल्या बेनिटोला पुढे थर्ड राईशच्या उदयानंतर हिटलरची मर्जी राखण्यासाठी प्रयत्न करावे लागले. १९४० सालात त्यानं त्याच्या देशातल्या ज्यू ना छळायला सुरुवात केली. दोस्त राष्ट्रांच्या लष्करानं सिसिलीतून युरोपात आक्रमण करायला सुरुवात केल्यावर १९४३ साली सम्राटानं त्याला बोलावून सांगितलं,

“प्रिय ड्यूस, मित्रा, इटलीचा आता सत्यानाश झालेला आहे. या देशातला तू सगळ्यात तिरस्कृत माणूस झाला आहेस.”
असं म्हणून त्याला घरातच बंदी बनवलं गेलं. दोन महिन्यांनी हिटलरच्या सैनिकांनी त्याची सुटका केली आणि त्याला उत्तर इटलीचा नामधारी प्रमुख बनवलं.

एप्रिल १९४५ मध्ये दोस्त राष्ट्रांचं लष्कर रोमकडे कूच करत असतांना बेनिटो आणि क्लॅरेटानं स्विझर्लंडमध्ये पळून जायचं ठरवलं. कोमो लेकजवळ एक ट्रक अडवला गेला. पैशानं भरलेली सुटकेस कवटाळून जर्मन हवाईदलाच्या गणवेषात ब्लॅंकेटच्या थप्प्यांखाली मुसोलिनी लपून बसलेला होता. मागच्या ट्रकमध्ये भयभीत झालेली क्लॅरेटा तशीच लपलेली होती.
२७ तारखेला त्यांना मेझेग्रा या गावी आणलं गेलं. त्याक्षणी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर केली गेली. त्याच्यावर जेव्हा रायफल रोखली गेली. तेव्हा क्लारा मध्ये आली आणि ‘त्याला मारू नका’ असं म्हणू लागली. पहिल्या बुलेटनं तिला मारलं गेलं. रायफल जॅम झाली. गोळी उडाली, पण त्यानं बेनिटो केवळ जखमी झाला. अंगावरचा सदरा काढून तो विनवू लागला,

“मला लवकर मारा!” गोळी यावेळी बरोब्बर छातीत गेली.

२८ एप्रिलला त्यांचे मृतदेह मिलानला आणण्यात आले. तिथं लोकांनी त्यांना लाथा मारायच्या होत्या. त्यांची विटंबना करायची होती. क्लारानं अंतर्वस्त्रं घातलेली नव्हती. तेव्हा जमावातल्या प्रौढ स्त्रियांनी पुढे येऊन तिच्या पायांमधून स्कर्ट बांधून त्याची गाठ मारली. त्यांच्या पायांना दोरी बांधून त्यांना उलटं लटकवण्यात आलं.

दोन दिवसांनी बर्लिनमधल्या बंकरमध्ये हिटलरनं इव्हा ब्राऊनला गोळी घालून स्वतःवर पिस्तुलानं गोळ्या चालवून आत्महत्या केली.

हुकूमशहा असे कुत्र्याच्या मरणानं मरतात.
(#ganeshvisputayscribe)