Home > News Update > राज्यातील डॉक्टरांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं पत्र...

राज्यातील डॉक्टरांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं पत्र...

राज्यातील डॉक्टरांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं पत्र...
X

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टर्स डे निमित्त राज्यातील डॉक्टरांना पत्र लिहिलेले आहे...

प्रिय डॉक्टर्स...

आज तुमचा दिवस..डॉक्टर्स डे..त्यानिमित्त खुप साऱ्या शुभेच्छा! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का ? तो दररोज आपल्यात हवा असतो. कोरोनाच्या संकटाने राज्याला विळखा घातला. त्या विळख्यातून नागरिकांना सोडविण्यासाठी डॉक्टर तुम्ही जीवाची बाजी लावत आहात. आज सगळीकडे धार्मिक स्थळं बंद असताना त्यातील देव कुठे असेल तर डॉक्टर तुमच्यारुपाने तो सगळ्यांना दिसतोय, अशी सार्वत्रिक भावना आहे. हजारो रुग्ण बरे होऊन घरी जाताय ते तुमच्या प्रयत्नामुळे. म्हणूनच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांपासून तुम्ही-आम्ही सर्वच कोरोनाला हरविण्याच्या ध्येयाने लढतोय. डॉक्टर तुमच्या साथीला आरोग्य कर्मचारी आहेत, पोलिस आहेत, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही आहेत. आपल्या सर्वांच्या या प्रयत्नामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहेत. नागरिक काळजी घेताना दिसताहेत. त्याची तीव्रता वाढत नाहीये.

डॉक्टर, आपली जबाबदारी मोठी आहे. कोरोना झाला या कल्पनेने हादरून गेलेल्या रुग्णांना उपचार देऊन त्यांच्या मनाला उभारी देऊन त्याना पुन्हा एकदा पुर्ववत करण्याच काम आपण करीत आहात. समोरच्याला कोरोना तर झाला नसेल या संशयानेच माणसांमध्ये काहीशी दरी निर्माण होऊ पाहतेय. मात्र डॉक्टर आपण, कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ उपचारातून बरे नाही करत तर मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभंही करीत आहात, आपल्या हातून घडणाऱ्या या मानवसेवेचं मोल कशातही मोजता येणार नाही.

तुम्ही कोविड योद्धे बनून आघाडीवर राहून कोरोनाशी अथकपणे, अविरत दोन हात करताय. आज राज्यात दीड लाख कोरोनाबाधितांपैकी जवळपास ९० हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून केलेल्या या अथक परिश्रमाचेच हे फळ आहे. यासंकट काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांना घरी सोडून येताना आपली मानसिक स्थिती काय होत असेल याची कल्पना आहे, तरीही कर्तव्य भावनेपोटी आपण कोरोनाशी लढायला दररोज घराबाहेर पडतात.आम्ही तुम्ही काळजी घेऊ मात्र तुम्ही घरीच सुरक्षित थांबा, असा प्रेमळ दिलासालाही सामान्य नागरिकांना आपण देता, डॉक्टर, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला सलाम.

राजेश टोपे

मंत्री,सर्वाजनिक आरोग्य विभाग,

महाराष्ट्र राज्य.

Updated : 30 Jun 2020 4:13 PM GMT
Next Story
Share it
Top