Home > News Update > खानावळी बंद झाल्याने पुण्याबाहेरच्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल

खानावळी बंद झाल्याने पुण्याबाहेरच्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल

खानावळी बंद झाल्याने पुण्याबाहेरच्या  विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल
X

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा विविध प्रतिबंधात्मक उपाय राबवत आहेत. बाजारहाट बंद ठेवणे हा त्यातलाच एक भाग. त्यातूनच हॉटेलं आणि खानावळीसुद्धा बंद करण्यात आले आहेत. परंतु त्यामुळे पुण्यात येऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच कंपन्यांचे कर्मचारी यांचे जेवणाचे मात्र हाल सुरू झाले आहेत. शासनस्तरावरून या समस्येवर तोडगा काढायचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसकर यांनी मॅक्समहाराष्ट्र ला दिलीय.

कॉट बेसिस वर निवास करणारी आणि खानावळीतल्या जेवणावरच गुजराण करणाऱ्यांची पुण्यात मोठी संख्या आहे. कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून शासन जे विविध उपाय राबवत आहे, त्यांचा भर लोकांची गर्दी टाळण्यावर प्राधान्याने आहे. ज्या ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात, गर्दी करतात, अशा गोष्टींवर सरसकट बंदी घालण्याचं धोरण सरकारने अवलंबलं आहे. परंतु या बंदीतून होणार्‍या दुष्परिणामांना पर्यायी व्यवस्था उभी न राहिल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले आहेत.

खानावळी वर अवलंबून असलेल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची पुण्यात मोठी परवड झाली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी या समस्येचं गांभीर्य ओळखून फेसबुकच्या माध्यमातून अशा लोकांना संपर्क करण्याचे आवाहन केलं;

पुण्यात कोरोनामुळे सर्व ठिकाणची हाॅटेल, खानावळ बंद आहे. जर कोणत्या विद्यार्थ्याची जेवणाची गैरसोय होत असेल तर केव्हाही हक्काने सांगा. उपाशी राहु नका. फक्त फोन करा. असं आवाहन नंदिनी जाधव यांनी केलंय. मात्र पुण्यातील शहरी भाग, पिंपरी, निगडी, कोथरूड अशा अनेक भागांतून त्यांना कॉल येऊ लागलेत.

नंदिनी जाधव यांनी मॅक्समहाराष्ट्राला सांगितलं की एका कॉलकर्त्यांने काकुळतीला येऊन विनंती केली कि गेले दीड दोन तास तो खूप फिरतोय; पण कुठे जेवणाची व्यवस्था होत नाहीये !

नंदिनी जाधव स्वतः दुचाकीवर लोकांपर्यंत पोहोचत आहेत. परंतु समस्येची व्याप्ती मोठी असल्याचे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आपल्या राहत्या सोसायटीतील महिलांना त्यांनी सहकार्याचं आवाहन केलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे काही महिला तयार झाल्या आहेत.

मूळचा अहमदनगरचा पण सद्या पुण्यात राहत असलेल्या हितेश राजगुरू ह्या कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं की खानावळी बंद असल्याने आमचे जेवणाचे हाल आहेत. कर्फ्यूची आमच्या डोळ्यासमोरची कल्पना वेगळी असल्याने बाहेर पडायचीही भीती वाटते. आता स्वत:च तात्पुरता किराणामाल आणून किडूकमिडूक काही बनवून खाता येईल का, या धडपडीत आम्ही आहोत.

नंदिनी जाधव आता पुणे आणि परिसरातील अनेक लोकांना संपर्क करून आपल्या जवळपासच्या दोन-चार दोन-चार तरी लोकांची जबाबदारी घेण्याचं आवाहन करीत आहेत. मॅक्स महाराष्ट्र च्या माध्यमातून त्यांनी पुणेकरांना आवाहन केलंय की, जर अशा प्रकारची अन्नसेवा करायला कोणी तयार असेल तर त्याचं समन्वयन व्हावं, यासाठी त्यांनी नंदिनी जाधव यांना 9422305929 या क्रमांकावर संपर्क करावा.

Updated : 20 March 2020 5:08 PM GMT
Next Story
Share it
Top