Home > News Update > सतत होणारे स्फोट, लागणाऱ्या आगीने तारापूर-बोईसर परिसर अतिसंवेदनशील...

सतत होणारे स्फोट, लागणाऱ्या आगीने तारापूर-बोईसर परिसर अतिसंवेदनशील...

सतत होणारे स्फोट, लागणाऱ्या आगीने तारापूर-बोईसर परिसर अतिसंवेदनशील...
X

मुंबईपासून अवघ्या ६० कि.मी. अंतरावर असलेल्या तारापूर परिसरात सरकारने १९७० च्या दशकात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा उदात्त हेतू यामागे होता. ग्रामीण भागात उद्योजकांनी रोजगार निर्मिती करण्यासाठी आपले कारखाने व उद्योग आणावेत. यासाठी सरकारने अनेक सोयी-सवलती उपलब्ध केल्या. आजमितीस कापड उत्पादन, अभियांत्रिकी,स्टील, रासायनिक, उद्योग या वसाहतीमध्ये सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात विविध कारखान्याच्या व्यवस्थापनानी स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यामध्ये सामावून घेतले.पण नंतरच्या काळात त्यांनी कंत्राटी पद्धत अवलंबली व सरकारच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला.

आज या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामध्ये कंत्राटी कामगारांची संख्या लक्षणीय आहे.

दुसरीकडे याच वसाहतीमधील रासायनिक कारखाने, सुरक्षेचे सारे नियम व कायदे धाब्यावर बसवून उत्पादन घेऊ लागले आहेत. त्यामुळे येथील रासायनिक कारखान्यात होणाऱ्या अपघाताचा ग्राफ सतत वाढत गेला. गेल्या सहा वर्षात सुमारे ६०० अपघात झाले व त्यामध्ये शेकडो कामगारांचे बळी गेले. तर हजारोंच्या संख्येने कामगार जायबंदी झाले. दर महिन्याला सरासरी एक अपघात, या अपघातात दोन ते तीन जणांचा बळी, असे प्रमाण कायम माथी बसले.

औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस यंत्रणा, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय व कामगार उपायुक्त कार्यालय, या पाच जणांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. व्यवस्थापनाला नोटिसा द्यायच्या आणि मग 'तेरी भी चूप,मेरी भी चूप,' त्यामुळे अनेक कामगारांची कुटूंब देशोधडीला लागली. दुर्देवाने याप्रश्नी आजवर एकाही लोकप्रतिनिधीने आवाज उठवला ना कधी विधानसभा व विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे येथील कारखानदारांचे धाडस वाढत गेले व ते मुजोर बनले.

आज हा संपूर्ण परिसर ज्वालामुखीवर वसला असून बैरुटसारखी दुर्घटना घडल्यास आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये. गेल्या काही वर्षात घडलेल्या अपघाताची मालिका लक्षात घेता, सरकारने अप्रिय घटना होण्यापूर्वी योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

अपघाताची मालिका :-

१) नोवा फेम स्पेशालिटी-स्फोट,

४ कामगार ठार, १३ जखमी,

८ मार्च २०१८,

२) यूपीएलई-ब्रोमीन रसायन गळती,एकाचा मृत्यू,चार कामगार गंभीर जखमी,

८ सप्टें.२०१८,

३) रामदेव केमिकल्स-स्फोट,२ कामगारांचा मृत्यू,

२० जाने.२०१९

४) साळवी केमिकल्स- पेटते

सॉलव्हेंट अंगावर पडल्याने सात कामगार गंभीर जखमी,

२७ जाने.२०१९,

५) आरती ड्रग्ज,-वायुगळतीमुळे ४५ कामगार बाधित,

१४ मे २०१९

६) स्क्वेअर केमिकल- वायगळती होऊन कारखाना मॅनेजरसह तीन कामगारांचा मृत्यू,

१२ मे २०१९,

७) करीगो ऑर्गनिक्स - स्फोट होऊन पाच किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला.

२४ मे २०१९,

८) एसएनए हेल्थकेअर- वायगळती होऊन सुपरवायझर ठार,

३० ऑगस्ट २०१९,

९) तारा नायट्रेट,स्फोट,५ ठार,५ जखमी,

११ जाने.२०२०,

१०) गॅलेक्सी सरफकटटंन,२ ठार,

१३ एप्रिल २०२०,

११) नांदोलीया ऑरगॅनिक केमिकल्स-स्फोट,२ कामगार ठार,४ जखमी.

१८ ऑगस्ट २०२०,

या औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचे व्यवस्थापन व संबंधित यंत्रणेतील अधिकारी,यांचे अर्थपूर्ण साटेलोटे असल्यामुळे तारापूर-बोईसर हा परिसर अत्यन्त संवेदनशील बनला असल्याचे येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Updated : 25 Aug 2020 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top