पुरग्रस्तांसाठी ६ हजार कोटींची तरतूद; मात्र केंद्राचा निधी यायला लागणार वेळ

अतिवृष्टीमुळे राज्यावर मोठं संकट निर्माण झालंय. लाखो लोकं या पुरामुळे बाधित झाली आहेत. या पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने ६ हजार ८१३ कोटी रुपयांच्या मदत निधीची घोषणा केली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या संदर्भात राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, केंद्राचा निधी यायला थोडा वेळ लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आणि कोकणातील अनेक गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. घरं उध्वस्त झाली आहेत, जीवनावश्यक वस्तू आणि जीवापाड जपलेली जनावरं पुरग्रस्तांनी गमावली आहेत. विविध भागांमध्ये अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी ही मदत घोषित केली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा पाठवला असून त्यानंतर पुन्हा पूरबाधित भागांचे पंचनामे करुन प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे.
६ हजार कोटी रुपयांपैकी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी ४ हजार ७०८ कोटी रुपये, कोकण, नाशिक आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २ हजार १०५ कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव आहे. म्हणजेच राज्यभरातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून एकूण ६,८१३ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.