कोरोनाशी लढा- पुणे जिल्ह्यासाठी केंद्रीय पथकाच्या या सूचना

central team pune

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी दिले. कोरोना प्रतिबंधासाठी दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात स्वयंसेवकांची मदत घेण्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे शहर आणि जिल्हयातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने आज पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र, हॉस्पीटल तसेच पुणे महानगरपालिकेची पाहणी केली. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली.

यावेळी सचिव कुणाल कुमार म्हणाले, पुणे जिल्हयात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत, झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. जेष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे का तसेच त्यांचा औषधोपचार व्यवस्थित सुरू आहे, याबाबतही कायम आढावा घेण्यात यावा.

याकामी त्याच परिसरातील वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची नेमणूक करावी, जेणेकरून या कामात गती येईल व स्वयंसेवक त्याच भागातील असल्याने तातडीने उपाययोजना करणे सुलभ होईल असे सांगतानाच पल्स ऑक्सीमीटरचा वापर करण्यात यावा, संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. तसेच कोव्हीड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी. कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.