त्याचं एक ट्विट आणि हजारो कामगार घरी पोहोचत आहेत

938

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी परतण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आजही हजारो-लाखो लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकारं आपापल्या परीने आणि पद्धतीने त्यांना इच्छित स्थळी नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अजूनही याला पूर्णपणे यश आलेलं नाही.

सोनू सूद करत असलेलं काम एव्हाना सगळ्यांना समजलंच असेल. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या वेगवेगळ्या राज्यातील कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पुढे आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करून तो त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था करतोय.

 सोनूनं आपल्या ट्विटरवर आवाहन केलं आणि आज हजारो लोक ट्विट करत त्याच्याकडे मदत मागत आहे. तो ही सर्वांना रिप्लाय करत मदतीचं आश्वासन देतोय आणि ते पूर्णही करतोय. सरकार दरबारी परवानगीसाठी प्रयत्न करत असलेले अनेकजण आज सोनूकडे मदत मागत आहेत.

अडकलेल्या लोकांची मोठी संख्या, कठोर नियमावली, वेगवेगळ्या परवानग्या, आरोग्य तपासण्या आणि या सगळ्या प्रक्रियेला लागणारा वेळ यामुळे आजही लाखो लोकांना घरी परतण्यासाठी विलंब होतोय. अशात सोनू करत असलेलं काम मोठं आहे.

सोनूनं ११ मे पासून २५ बसमधून साधारण एक हजार लोकांना उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पोहचवलंय. १० बस बिहार आणि उत्तरप्रदेशसाठी निघाल्या आहेत आणि आणखी १०० बसची व्यवस्था करण्यात आलीय. बसमध्ये सर्व प्रवासी सोशल डिस्टनसिंग पाळून आहेत. त्यांना प्रवासात लोकांना जेवण्याची व्यवस्था आहे आणि लोकांना अगदी घरापर्यंत पोहचवलं जातंय.

कामगारांना पायी आपल्या गावी जात असल्याचं पाहून वेदना झाल्या आणि तेव्हाच या लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्याचं ठरवलं. जोपर्यंत शेवटचा कामगार आपल्या घरी पोहचत नाही तोपर्यंत हे काम सुरू ठेवणार असल्याचं सोनू सांगतो. त्यानं याआधी पंजाबमधील डॉक्टरांसाठी दीड हजार पीपीई किट्स दिल्या आहेत. मुंबईतील त्याचं हॉटेलही त्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दिलंय.

आपल्या काही मित्र आणि सहकाऱ्यांसोबत मिळून सोनू हे काम करतोय. त्याच्या या कामगिरीचं सर्व स्तरांतून कौतुक होतंय. सोशल मीडियावर मिम्स बनत आहेत. त्याच्या ट्विट्सचे स्क्रीनशॉट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/SonuSood/status/1264230220241854464?s=19

मला यात सर्वात महत्वाचं काय वाटलं असेल तर तो सोनूचा पॉझिटिव्ह ऍटीट्युड. ज्या पद्धतीने तो लोकांना सामोरं जातोय, त्यांच्याशी संवाद वाढतोय ते अगदीच कमाल आहे. आलेल्या ट्विटला त्याने दिलेला रिप्लाय त्यांच्यातली संवेदनशीलता दाखवतो. त्याच्या ट्विटरवर चक्कर मारून आलात तर तुम्हाला लक्षात येईल.

त्याचे ट्विट्स, त्याची भाषा ही कोणालाही आपलंसं करणारी आहे. कित्येक दिवसांपासून हलाखीत दिवस काढणाऱ्यांनासाठी त्याचे शब्दच मोठा आधार बनत आहेत.