Home > News Update > क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक ठरलं बोट बुडायचं कारण !!!

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक ठरलं बोट बुडायचं कारण !!!

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक ठरलं बोट बुडायचं कारण !!!
X

गेटवे येथून अजंठा ही प्रवासी बोट 88 प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे येताना बोटीत पाणी घुसून बोट बुडाली. अजंठा प्रशासन बोटीची क्षमता 50 ते 60 प्रवाशांची असतानाही जास्त प्रवाशी नेहमी भरून आणत असतात, शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही हवी तशी सोय केलेली नसते अशी तक्रार नेहमीच प्रवाशांकडून होत असते. मात्र याकडे दुर्लक्ष करून अजंठा प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचं आजच्या घटनेत दिसून आलं आहे.

गेटवे येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अजंठा बोट 88 प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे निघाली होती. मांडवा बंदराजवळ बोट आली असता अचानक बोटीत बिघाड होऊन पाणी घुसू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडू लागले. मांडवा पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे या 88 प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत व सद्गुरू कृपा बोटीतील दोन खलाश्यानी त्वरित धाव घेऊन बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले.

मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना माहिती मिळताच त्यांनी सद्गुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यास तातडीने पाठवून दिले. बोटीच्या खलाशानी तातडीने जाऊन त्यांनी व प्रशांत घरत यांनी बुडणाऱ्या 88 जणांचे प्राण वाचवून त्यांना सुखरूप मांडवा बंदरात सोडले. बोट पोहचण्यास वेळ झाला असता तर 88 जणांना जलसमाधी मिळाली असती. मात्र बोटीचे खलाशी आणि पोलीस नाईक वेळीच पोहचल्याने प्रवाशांचे प्राण वाचले.

मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व प्रवाशांना मदत केली. तर बोट काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अजंठा या बोटसेवा देणाऱ्या कंपनीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मराज सोनके यांनी सांगितले.

Updated : 14 March 2020 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top