मुंबईकर वा-यावर, नगरसेवक आणि कुटुंबीयांची विशेष तपासणी!

देशात कोरोनाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईमध्ये रुग्ण वाढू नये यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोनाचे रुग्ण शोधण्याचे काम सुरू आहे. कोरोनाची लक्षणं जाणवली तर नागरिकांनी तातडीने तपासणी करुन घ्यावी असं आवाहन मुंबई महापालिका वारंवार करत आहे.

पण दुसरीकडे मुंबईकरांचे महापालिकेत प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य मुंबईकर यांच्यात महापालिकाच भेदभाव करत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. मुंबईकरांची घरोघरी जाऊन तपासणी न करता मुंबईकरांना वा-यावर सोडणारी मुंबई महानगरपालिका आता नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबियांची खासगी लॅबतर्फे विशेष तपासणी करणार आहे.

फक्त नगरसेवकांचीच का, सर्व मुंबईकरांची तपासणी का केली जात नाही असा सवालही अनिल गलगली यांनी केला आहे. यासंदर्भात गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता पत्र लिहून सर्वसामान्य मुंबईकर, अभियंते, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांची तपासणी का केली जात नाही? असा प्रश्न विचारला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.