#महाराष्ट्र_बचाव आंदोलन | भाजप नेत्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा ‘हाहा’कार

कोरोना काळात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘आपलं अंगण हेच रणांगण’ असं ब्रीदवाक्य घेऊन हे आंदोलन करण्यात आलं.

भाजप नेत्यांनी काळे कपडे परिधान करून आणि फलक दाखवून राज्य सरकारचा निषेध केला. त्यानंतर आंदोलनासंदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकल्यावर मात्र भाजप नेत्यांना नेटकऱ्यांचा रोषाला सामोरं जावं लागलं.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांना अनोख्या पद्धतीने ट्रोल केलं जातंय. भाजप नेत्यांनी फेसबुकवर कसलीही पोस्ट टाकली की नेटिझन्स त्यावर ‘हाहा’ रिऍक्ट (हसण्याची प्रतिक्रिया) करत आहेत.

आज भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनादरम्यानही हेच झालं. भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या फेसबुकवर पोस्टवर आज हजारोंच्या संख्येने ‘हाहा’ रिऍक्शन्स आले आहेत. विशेष म्हणजे एकूण लाईक्समध्ये सर्वाधिक प्रतिक्रिया या हसण्याच्या आहेत.

यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर, हर्षवर्धन पाटील, नितेश राणे, चित्रा वाघ यांच्या पोस्टवर एकूण लाईक्सपेक्षा हसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पोस्टलाही हजारोंच्या संख्येने ‘हाहा’ रिऍक्शन्स आल्या आहेत.