अजित पवारांच्या ‘या’ निर्णयाचं भाजपनं केलं स्वागत

कोरोनाचे संकट ध्यानात घेता पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची परंपरा चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं भारतीय जनता पक्षाने स्वागत केलं आहे.

पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वारकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. कोरोना काळात वारीची परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी माऊलींच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलंय. या निर्णयामुळे वारीची परंपरा खंडित होणे टाळले जाईल आणि कोरोनापासून बचावही केला जाईल असं पाटील यांनी म्हणलंय. तर वारकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करावं आणि पंढरपूरला न जाता आपल्या घरीच विठ्ठलाची पूजा करावी असं आवाहनही त्यांनी केलंय.