राज्य सहकारी बँकेचा घोटाळा असा आला बाहेर!

शिखर बँक घोटळयाप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घोटाळा नक्की काय आहे?

नक्की काय आहे घोटाळा?

राज्यातील सर्व जिल्हा बँकेचे नेतृत्व करत असलेल्या राज्य सहकारी बँकेत २००५ ते २०१० या काळात कर्ज वाटपात २५ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा ठपका नाबार्ड च्या अहवालात ठेवण्यात आला. तारण न घेता सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांना बेकायदेशीर कर्ज वाटप, वसुलीमध्ये टाळाटाळ, दिवाळखोरीत निघालेले साखर कारखाने, गिरण्यांच्या खरेदीमध्ये अनियमितता असल्याचा ठपका तत्कालीन संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे.
हा संपूर्ण घोटाळा ज्यांनी उघडकीस आणला. त्या पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रने बातचित केली.

हा राज्य सहकारी बँकेचा घोटाळा जेव्हा मला समजला. त्यावर मी लोकमत या वृत्तपत्रात २०१० साली या घोटाळ्याच्या बातमीची मालिका लिहीली होती. त्यानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलं. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले व संचालक मंडळ बरखास्त करून नवीन प्रशासक नेमण्यात आलं. ते प्रशासक अजून पर्यंत संचालक मंडळावर आहेत. या युतीच्या सरकारने गेली पाच वर्ष या घोटाळ्याच्या आरोपींवरती कोणतीही कारवाई केली नाही. आत्ताच का कारवाई होते हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे. विधानसभेच्या निवडणूक डोळ्यासमोर आहे म्हणून तरी नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.