राज्यात एका दिवसात 5 हजार 434 ग्राहंकाना घरपोच मद्यविक्री

Courtesy: Social Media

लॉकडाऊनच्या काळात राज्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर मद्यविक्री करणाऱ्या दुकानांच्या बाहेर झालेल्या गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला. त्यामुळे गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी शुक्रवारपासून घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली आहे.

शुक्रवारी दिवसभरात राज्यातील 5 हजार 434 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. यापैकी सर्वाधिक ग्राहक हे नागपूर आणि लातूर इथले असून ही संख्या 4 हजार 875 असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान 14 मे रोजी राज्यात 84 गुन्हे नोंदवण्यात आले असून 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 22 लाख 62 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान 24 मार्च ते 14 मेपर्यंत लॉकडाऊनच्या काळात राज्यात एकूण 5 हजार 489 गुन्हे नोंदवण्यात आले असून 2 हजार 457 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 554 वाहने जप्त करण्यात आली असून 14 कोटी 93 लाखांची दारु जप्त करण्यात आली आहे.