Home > News Update > गावाला रस्ता नाही म्हणून ‘या’ गावातील लोकांनी केली अजब मागणी...

गावाला रस्ता नाही म्हणून ‘या’ गावातील लोकांनी केली अजब मागणी...

गावाला रस्ता नाही म्हणून ‘या’ गावातील लोकांनी केली अजब मागणी...
X

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या करंजे गावात अडीजशे घरांची ‘यादव मळा’ नावाची वस्ती आहे. येथील लोक गेल्या साठ वर्षापासून रस्त्यासाठी संघर्ष करत आहे. पावसाळ्यात जीवावर उदार होऊन विद्यार्थी तसेच ग्रामस्थ या रस्त्यावरून प्रवास करत असतात.

स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात या रस्त्यावर एकदाही डांबर पडलेले नाही. खानापूर आणि तासगावच्या सीमेवर असणाऱ्या या वस्तीवरील लोकांनी एकतर आम्हाला रस्ता द्या. अथवा आमचे वेगळे महसूली गाव करून आमचा तालुका बदला अशी प्रतिक्रिया मॅक्समहाराष्ट्र कडे दिली आहे.

माजी सैनिक वसंत यादव सांगतात, ‘देश स्वतंत्र झाला पण विकास आमच्या वस्तीवर पोहोचलाच नाही. गावाच्या जवळून गुहागर हायवे जातो. मात्र, गावातून बाहेर जाण्यासाठी आम्हाला गुडघाभर पाण्यातून चिखल खड्डे तुडवत जावे लागते. मग हे सरकार खेड्यांसाठी आहे का? आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहोत का? असा प्रश्न आम्हाला पडतो. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्हाला अतिरेकी असल्याची वागणूक देऊ नका.’’ असे ते सांगतात.

हा रस्ता नकाशात आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलेले आहे.

सदाशिव यादव हे हृदय विकाराचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया झाली आहे. पावसाळ्यात काही झालं तर त्यांना दवाखान्यात कसं पोहचवायचे या चिंतेने त्यांची पत्नी अस्वस्थ आहे.

एका बाजूला देश प्रगती करत आहे. मोठमोठे रस्ते पूल इमारती उभ्या राहत आहेत. डिजिटल म्हणून देशाची ओळख होत आहे. तर दुसऱ्या बाजूला खेड्यातील लोकांना गुडघाभर चिखलातून वाट काढत जावे लागत आहे. ही शोकांतिका आहे.

या वस्तीवर बहुसंख्य शेतकरी आहेत. दुधाचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात होते. मात्र, उत्पादित दूध पावसाळ्यात डेअरी ला कसे पोहचवायचे असा प्रश्न लोकांना पडतो.

6 दशकांपासून रस्त्यासाठी लोक संघर्ष करत आहेत. मात्र, केवळ 800 मीटरचा रस्ता आता मंजूर झाला आहे. मात्र, रस्ता मंजूर एकीकडे आणि काम चालू दुसरीकडे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

लोकांनी हे काम आता बंद पाडले आहे. गोपीनाथ सूर्यवंशी सांगतात ‘निवडणुकीला मते मागायला फक्त नेते येतात. मात्र, प्रश्न घेऊन गेलो की, त्याकडे लक्ष देत नाहीत. येथील लोकांमध्ये असंतोष आहे. ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. इतक्या वर्षानंतर तरी लोकप्रतिनिधींचे डोळे उघडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा रस्ता झाला नाही तर येणाऱ्या काळातील सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामस्थ करणार आहेत.

Updated : 19 Jun 2020 2:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top