Home > News Update > कोझिकोड विमान दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना धनंजय दातार यांची मदत

कोझिकोड विमान दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना धनंजय दातार यांची मदत

कोझिकोड विमान दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना धनंजय दातार यांची मदत
X

एअर इंडियाचे (air india) दुबईहून आलेले विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर घसरुन अपघात झाला होता. या अपघातात पायलट आणि सह-पायलट व प्रवाशांसह १८ जण मृत्यूमुखी पडले. या मृतांच्या वारसांना अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, असे दातार यांनी सांगितले आहे.

“या विमानाचे सारथ्य भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेऊन एअर इंडियात आलेले, अत्यंत अनुभवी व निष्णात वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे करत होते. ते भारतीय हवाईदलाचे उत्कृष्ट व गौरवपूर्ण कामगिरी बजावलेले अधिकारी होते. माझे दिवंगत वडील महादेव दातार हेसुद्धा भारतीय हवाईदलाचे माजी अधिकारी होते. त्यामुळे मला या दलाविषयी प्रबळ आत्मीयता आहे. मी या विमान अपघाताची बातमी ऐकली तत्क्षणी त्यातील मृतांसाठी स्वतःहून काही मदत करण्याची उर्मी मनात दाटून आली.” असे धनंजय दातार यांनी म्हटले आहे.

“या दुर्दैवी विमान अपघातातील अनेक प्रवासी असे होते ज्यांनी परदेशातील त्यांचे रोजगार गमावले होते. अनेकजण व्हिजिट व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अनेकांपुढे आर्थिक विवंचना होत्या. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या कुटूंबियांवरील किमान आर्थिक दडपण काहीसे हलके व्हावे म्हणून मी वैयक्तिकरीत्या हा पुढाकार घेतला आहे. गेलेला जीव परत येणार नाही याचे दुःख आहेच, पण या अर्थसाह्यामुळे किमान मृतांच्या कुटूंबाना अडचणींवर मात करण्यात मदत तरी होईल. मी एअर इंडियाच्या आपत्ती व्यवस्थापन संघाशी थेट समन्वय साधून ही मदत अखंड स्वरुपात योग्य व गरजू लोकांच्या हाती पडेल यासाठी प्रयत्न करत आहे. मला नेहमीप्रमाणेच भारतीय कॉन्सुलेटचा या मोहिमेसाठीही पाठिंबा मिळत आहे.”

डॉ. धनंजय दातार हे सध्या आणखी एका सामाजिक मदत उपक्रमात व्यस्त आहेत. कोविड १९ साथीमुळे अरब देशांत अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी सुखरुप पोचवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत दहा लाख दिऱ्हॅमहून अधिक खर्च केला आहे. आतापर्यंत त्यांच्या मदतीमुळे ३८०० हून अधिक भारतीयांना घरी सुरक्षित जाता आले आहे. गरजू व निर्धन भारतीय कामगारांच्या मोफत विमान तिकीटाचा व मोफत वैद्यकीय चाचणीचा खर्च डॉ. दातार उचलत आहेत. याखेरीज परदेशात अडकलेल्या भारतीयांना खाद्यपदार्थांचे मोफत कीट पुरवणे व त्यांच्यासाठी मोफत क्वारंटाइनची व्यवस्था करणे, यासाठीही ते धनंजय दातार हे खर्च करत आहेत.

Updated : 24 Aug 2020 8:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top