अजित पवारांनी उभारली निश्चयाची गुढी, तर मोदी अमित शहांचे मराठीत ट्विट

राज्यावर कोरोना चे संकट असताना राज्यातील जनेतेने घरोघरी गुढी उभारुन नवीन वर्षाला सुरुवात केली आहे. खरं तर राज्यात नवीन वर्षाची सुरुवात शोभायात्रांचं आयोजन करुन सामुहिक पद्धतीनं करण्याची आपली परंपरा आहे. परंतु ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लोकांनी फक्त आपल्या घरावर गुढी उभारल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज घरगुती स्वरूपात गुढी उभी करून राज्यातील जनतेला गर्दी न करता गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याचा कृतिशील संदेश दिला आहे.

राज्यातील जनतेने कोणतीही गर्दी न करता घरगुती स्वरूपात आपला गुढीपाडवा सण साजरा करून मराठी नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केलं आहे.

‘महाराष्ट्रातील लोक आज गुढीपाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो. या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.’ असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.