Home > News Update > सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या – राज ठाकरे

सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या – राज ठाकरे

सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या – राज ठाकरे
X

राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानंतर ठाण्यातील मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुले याने आत्महत्या केल्यानंतर राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पत्राद्वारे जाहीर आवाहन केलं आहे.

पुन्हा एकदा जाहीर आवाहन

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,

सस्नेह जय महाराष्ट्र

आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा.

प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे.

पण माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की.

ईडी सारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरं देईन. म्हणून मी पुन्हा सांगतो, तुम्ही सर्वानी शांतता राखा आणि कोणीही उद्या ईडीच्या कार्यालयाच्या जवळ कोणीही येऊ नका. कालच्या माझ्या सूचनेनंतर देखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असं मला कळलं, तुमचं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही.

आणि काल मी जे सांगितलं तेच पुन्हा सांगतो तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्या.

बाकी ह्या विषयावरजे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.

तो पर्यंत तुम्ही सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या.

आपला नम्र

राज ठाकरे

Updated : 21 Aug 2019 11:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top