भाजपविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या आंदोलन

68

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपाविरोधात काँग्रेसनं आता आक्रमक भूमिका घेत  उद्या राज्यभरात तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा केलीये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिलीये. भाजप नेते जयभगवान गोयल यांनी आज के शिवाजी – नरेंद्र मोदी या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन केलंय.

त्यानंतर शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही अशी भूमिका घेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल केलाय. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत.

छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही ‘आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे,  असं काँग्रेसतर्फे सांगण्यात आलंय.

शिवस्मारकातही घोटाळा करणाऱ्या भाजपला खरेतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केलीये.