देशभरात कोरोनाचा वाढता प्रसार, २४ तासात धक्कादायक वाढ

देशभरात कोरोनाच्या विषाणूचा प्रभाव आता वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात ६ राज्यांमध्ये कोरोनाचे १०६ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता ९७९ पर्यंत पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २५ वर गेली आहे. गेल्या २४ तासात ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागामार्फत ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. पण सध्या किती रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत याची माहिती सध्या केंद्र सरकारकडे उपलब्ध नाहीये. दरम्यान ICMR ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३४ हजार ९३१ जणांची तपासमी करण्यात आली आहे. देशभरात आतापर्यंत सरकारी ११३ आणि खासगी ४७ लॅबमध्ये कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत.

दरम्यान सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरांमधून आपापल्या गावांकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांची सोय त्या त्या राज्यांनी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं आधीच दिले आहेत. तर जे मजूर अडकले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या गावी नेण्याची सोय करण्यात येत असून त्यांना १४ दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचंही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. तसंच जे मजूर किंवा कामगार शहरांमध्ये थांबले आहेत त्यांच्याकडून घरमालकांनी एका महिन्याचे भाडे आकारु नये अशी सूचनाही सरकारतर्फे करण्यात आली आहे.