देश कोरोनाने हैराण,सरकार मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सीवर मेहेरबान !

देशाचा पैसा लुटणाऱ्या प्रत्येकाकडून पैसा वसूल केला जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार देत आहेत. पण आता रिझर्व्ह बँकेने बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या उद्योगपतींची तब्बल ६८ हजार कोटींची कर्जे माफ केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारख्या कर्जबुडव्यांचाही समावेश आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बँकेकडून ही देशातील ५० बड्या थकबाकीदारांची यादी मागवली होती. त्याला रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. माफ केलेले कर्ज हे तब्बल ६८ हजार ६०७ कोटी रुपये आहे. 30 सप्टेंबर २०१९पर्यंतचे हे कर्ज आहे. साकेत गोखले यांनी ट्वीटरवरुन या ५० जणांची यादीच जाहीर केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अर्थमंत्र्यांकडे देशातील ५० कर्जबुडव्या उद्योगपतींची नावं मागितली होती. पण अर्थमंत्र्यांनी ती नावे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर साकेत गोखले यांनी केलेल्या अर्जाला रिझर्व्ह बँकेने २४ एप्रिल रोजी उत्तर दिले आहे. या यादीत मेहुल चोक्सी याला सर्वाधिक कर्ज दिल्याचे आणि ते थकीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

पण या यादीत टेक्निकली रिटन ऑफ असा शेरा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. म्हणजे बँकांच्या बॅलन्सशीटवर आणि अनुत्पादक मालमत्तेच्या हिशेबावर याचा परिणाम होऊ नये म्हणून ती बॅलन्सशीटमधून काढली जातात. पण या कर्जांच्या वसुलीची प्रक्रिया सुरूच राहते अशी सारवासारव रिझर्व्ह बँकेने याआधीही केलेली आहे.