Home > News Update > मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंपुढे नवं संकट

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंपुढे नवं संकट

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंपुढे नवं संकट
X

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पहिला मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे आरे मधील झाडांचं एकही पान तोडणार नाही असा. पण झाडे न तोडण्याच्या निर्णयावर उध्दव ठाकरे ठाम राहणार आहेत की नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. निमित्त आहे ते औरंगाबाद येथे होणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं. औरंगाबाद इथं स्मारक बांधण्यासाठी तब्बल 5 हजार झाडांचा बळी द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता कोंडीत सापडलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावर काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.

औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधण्याचा प्रस्ताव आहे. प्रियदर्शनी उद्यानात हे स्मारक उभारलं जाणार असून तसा प्रस्तावही महानगरपालिकेत दिला गेला आहे.

स्मारकाचं कामही सुरू झालं आहे. या कामात 5 हजार झाडं कापावी लागणार असून या बाबत शिवसैनिकांकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. स्मारक उभारण्यासाठी १ हजार १३५ चौरस मीटर, फुड पार्कसाठी २ हजार २२० मीटर, म्युझिअमसाठी २ हजार ६०० चौरस मीटर तर ३ हजार ६९० चौरस मीटर उघडी जागा असणार आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आरेमधील झाडांच्या कत्तलीला शिवसेनेनं विरोध केला होता. इतकंच नाहीतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात याबाबत अनेक भाषणंही उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केली आहेत. आमचं सरकार आलं तर एकही झाड तोडू देणार नाही. असं सांगण्यात आलं होतं. मुख्यमंत्रीपदावर उध्दव ठाकरे आल्यानंतर त्यांनी लागलीच निर्णयही जाहीर केला. हाच निर्णय ते औरंगाबादमध्ये लागू करणार का? असा सवाल पर्यावरण प्रेमी विचारत आहेत.

प्रियदर्शनी उद्यानात ७० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी, ४० प्रकारची फुलपाखरे आण अन्य प्राणी जीव आहेत. सिडकोच्या ताब्यात असलेलेले हे उद्यान महानगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर सुमारे 400 झाडं तोडण्यात आली आहेत. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे.

या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारल्यास ५ हजार झाडांची कत्तल करावी लागणार असल्याचं मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबईतल्या आरेमधील झाडांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आता औरंगाबादमध्ये राहणार की बदलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Updated : 7 Dec 2019 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top