Home > News Update > मुंबई कोलमडण्यास कारण की.. ?

मुंबई कोलमडण्यास कारण की.. ?

मुंबई कोलमडण्यास कारण की.. ?
X

वीकएंड गाजवणाऱ्या पावसाने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पायाला भिंगरी बांधून धावणाऱ्या मुंबईकरांच्या वेगाला ब्रेक लावलाय. मुंबईची लाईफलाईन असलेली मध्य, पश्चिम, हार्बरची लोकलसेवा लोकलसेवा कोलमडून पडलीय. लोकल ट्रॅकवर पाणी तुंबल्याने वाट शोधत तिन्ही मार्गावरची वाहतूक मुंगीच्या पावलांनी सुरु आहे. नेमेचि येतो पावसाळा याप्रमाणे मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबले असून महापालिकेच्या सर्व दाव्यांची पावसाने पोलखोल केलेय.

इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस रद्द

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे भुसावळ एक्स्प्रेस, पनवेल पुणे पॅसेंजर, पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर कोयान एक्स्प्रेसही मुंबई ते पुणेदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

भुसावळ पुणे एक्स्प्रेसची यात्रा नाशिक रोड स्थानकात संपवण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या मुंबईहून पुणेमार्गे जाणाऱ्या ट्रेन्स या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे दिली आहे.

हिंदमाता, किंग्ज सर्कल, अंधेरी, दादर, परळ या भागांमध्ये पाणी तुंबले होते. वांद्रे येथील एस. व्ही रोड भागातही पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. घाटकोपर ते कुर्ला या स्थानकांदरम्यान लोकल्स सुमारे २० मिनिटे थांबत आहेत. मरीन लाइन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेट ते मरिन लाईन्स वाहतूक बंद करण्यात आली आहे. चर्नी रोड भागात एक ट्रेन बंद पडल्याने जलद लोकल्सची वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आली आहे.

पालघर, डहाणूत तुफान पाऊस

पालघर, डहाणू तालुक्यात तुफान पाऊस पडत असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावच्या अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. बलसाड-वापी, वापी सुरत, डहाणूरोड ते बोरीवली या आणि अशा ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. केळवे स्थानकात पाणी साठल्याने आणि पालघर, डहाणू परिसरात तुफान पाऊस झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण गुजरात, पालघर भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर, फ्लाईंग राणी यांच्यासह अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण १३ गाड्या रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

सायन- माटुंगा परिसरात वाहतुकीचा चक्का जाम

लोकलप्रमाणे मुंबईच्या रस्ते वाहतुकीचा वेगही मंदावला असून सायन- माटुंगा परिसरात महामार्गावर सुमारे ६ तास वाहतुकीचा चक्का जाम झाला होता. मुंबई शहर आणि उपनगरातही पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. सायन-पनवेल महामार्गावरही प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.

Updated : 1 July 2019 7:10 AM GMT
Next Story
Share it
Top