भाजप आमदाराची दंडुकेशाही; अधिकाऱ्याला बॅटने मारहाण

इंदूरमध्ये ठोकशाही, दंडुकेशाहीचे दर्शन घडवत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिका अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इंदुर महापालिका अधिकाऱ्यांचे एक पथक जुन्या व पडण्याच्या स्थितीत असलेली घरं पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी आकाश त्यांच्यावर धावून गेले. तुम्ही ५ मिनिटांच्या आत इथून निघून गेला नाहीत, तर जे काही होईल त्याला कर्मचारीच जबाबदार असतील, अशी धमकी आकाश यांनी दिली. मात्र, कर्मचारी माघारी जात नसल्याचे पाहून आकाश यांनी क्रिकेटच्या बॅटने कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
या वेळी आकाश यांनी तोडकामासाठी आलेल्या जेसीबी मशीनची चावीही काढून घेतली. हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आकाश हे क्रिकेटच्या बॅटने कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. विभागीय अधिकारी धीरेंद्र बायस आणि असीत खरे इंदूर महापालिकेच्या टीमसह जेल रोडवरील गंजी कंपाउंडममधील जुनी दुमजली धोकादायक इमारत तोडण्यासाठी पोहोचले होते. या धोकादायक इमारतीत एकूण ५ कुटुंबे राहतात. तसे पाहिले तर सर्वांनीच घरे खाली केली होती. मात्र, एका भाडेकरूचा एका अधिकाऱ्याशी वाद झाला. इतक्यात, आमदार आकाश विजयवर्गीय तिथे पोहोचले आणि त्यांचाही अधिकाऱ्यांशी वाद सुरू झाला.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर आकाश यांनी हातात बॅट घेत धीरेंद्र बायस यांना मारहाण केली. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनीही बायस यांना मारहाण केली. मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी या घटनेवर बोलताना सांगितले की, नेता कितीही मोठा असो, जर त्याने कायदा हातात घेतला, तर कायदा आपले काम नक्कीच करेल. या प्रकरणी आमदार आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.