म्हणून दिला सिद्धूंनी मंत्रीपदाचा राजीनामा

म्हणून दिला सिद्धूंनी मंत्रीपदाचा राजीनामा

सध्या काँग्रेसमध्ये अनेक घडामोडींना उधाण आलं आहे कधी कुणी पक्ष सोडून जातोय तर कुणी अंतर्गत वादामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देतोय. नुकतेच पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यातील मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
१० जून रोजी सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्याचा आज खुलासा केला आहे. सिद्धूंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना लवकरच आपला राजीनामा देणार असल्याचे ट्विटही सिद्धूंनी केलं आहे.

का दिला नवज्योत सिंह सिद्धूंनी मंत्रीपदाचा राजीनामा?

लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला पंजाबमध्ये अपेक्षित यश संपादित करता आलं नाही. याच खापर मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी सिद्धू यांच्यावर फोडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. लोकसभा निवडणुकांनंतर सिद्धूंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. दरम्यान निवडणुकांनंतर मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी सिद्धंूसह अन्य नेत्यांची मंत्री पदे बदलली त्यात सिद्धूंकडे नागरी प्रशासन विभाग होतं त्याऐवजी त्यांना ऊर्जा खात्याचा भार सोपविण्यात आला होता.