Home News Update परग्रहयानाची वडखळ महामार्ग वारी…

परग्रहयानाची वडखळ महामार्ग वारी…

परग्रहावरून पृथ्वीच्या दिशेने एक यान झेपावले. त्याने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला. पृथ्वीवरील भौगोलिक परिस्थिती, जीवसृष्टी, खनीज यांचा शोध घेणे हा त्यामागचा उद्देश होता. योगायोगाने ते यान मुंबई गोवा महामार्गावरील पेण ते वडखळ पट्ट्यात मध्यरात्री उतरलं. परग्रहवासी यानातून खाली उतरले. त्यांच्यासाठी हा प्रदेश तसा नवीनच होता. कारण पृथ्वीच्या या पट्ट्यात कधीही परग्रहावरची यान उतरली नव्हती. त्यामुळे येथील भौगोलीक परिस्थिती जाणून घेण्याचे कुतूहूल परग्रहवासीयांच्या मनात होते.
महामार्गावर सुरक्षितपणे उतरल्यावर, त्यांनी आसपासची परिस्थिती पाहण्यास सुरवात केली. तेव्हा परग्रहांप्रमाणे येथेही असंख्य लहानमोठी विवरे आढळून आली. मात्र हि विवरे धुमकेतू मुळे तयार झाली नसून मानवनिर्मीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही विवरांमध्ये पाण्याचे अवशेषही त्यांना आढळून आले. सखोल निरीक्षण केल्यावर त्यात चिखल आणी माती मिश्रीत खडीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी रस्त्यालगत लोहखनीज आणि कोळसा पडला असल्याचे निरीक्षण त्यांच्या सोबत आलेल्या रोव्हरने नोंदविले. मानव निर्मित वाहने या विवरांमधून आदळत आपटत मार्गक्रमण करत होती. या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक होती. त्यामुळे त्यांचा वेगही कमालीचा मंदावलेला होता. आकाशातून असंख्य जलधारा कोसळून या विवरांमध्ये विसावत होत्या.
पृथ्वीवरील मानवाने प्रगती केल्याचे परग्रहवासीय ऐकून होते. पण वडखळ ते पेण येथील महामार्गाची परिस्थिती पाहून त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. भ्रमनिरास झाला. अखेर परग्रहाप्रमाणेच पृथ्वीवर मानवनिर्मित कारणांमुळे महामार्गावर असंख्य विवरे तयार झाली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आणि रोव्हर आणि परग्रहावासियांनी पुन्हा एकदा यानात बसून काढता पाय घेतला.
वैधानिक इषारा- सदर घटना काल्पनिक आहे. भौगोलिक परिस्थितीशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा…
-हर्षद कशाळकर

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997