मेट्रोची कामं आणि साचलेल्या कचऱ्यामुळे मुंबईकर त्रस्त

मेट्रोची कामं आणि साचलेल्या कचऱ्यामुळे मुंबईकर त्रस्त

जगातल्या सगळ्यात जास्त ट्राफिकचा मारा झेलणाऱ्या शहरांमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत सकाळी  आणि संध्याकाळच्या ट्राफिकची गर्दी तुम्हां-आम्हा सर्वांना माहीतच आहे. त्यातच कचराकुंडीच्या बाहेर पडणारा कचरा रस्त्यावर येऊन मुंबईकरांना त्रास देत असतो. गेल्या आठवड्यातच मुंबईच्या किनाऱ्यावर समुद्रातून तब्बल १८८ मेट्रिक टन कचरा आला. त्यामुळे संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. समुद्रकिनाऱ्याची ही परिस्थिती मुंबई शहरातदेखील बघायला मिळते.
कचऱ्याचे उंचच उंच डोंगर आणि त्या कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे प्रदूषण निर्माण होते. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. मुंबईत रोज 7,000 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. परंतू या संपूर्ण कचऱ्याच्या ३% टक्क्याहून कमी कचऱ्यावर पुनप्रक्रिया केली जाते. इतक्या मोठ्या महानगरात फक्त ३% कचऱ्यावर पुनप्रक्रिया होते ही एक चिंतेची बाब आहे. या गंभीर समस्येला सामान्य मुंबईकर तोंड देत आहेत.
सध्या मुंबई शहरात मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामांमुळे सहाजिकच वहातुकीवर परिणाम होतोय. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढच्या काळात दळणवळण सुलभ होण्यासाठी मुंबईकर हा त्रास सहन करत आहेत. मात्र, रस्त्यांवरच्या कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
टिळकनगरच्या पेस्तम सागर एम. जी.  रोड परिसरात मेट्रो 4 चं काम सुरु आहे. या रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंडीतून नेहमी कचरा भरुन वाहत असतो. हा सगळा कचरा बाहेर रस्त्यावर पडतो आणि संपूर्ण रस्ता घाण होऊन परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना रोज या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय.
मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोचं काम सुरु असलेल्या बहुतांश ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थीती आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर मेट्रोच्या कामामुळे अगोदरच रस्ता लहान झाला आहे. आणि त्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या कुंड्या लोकांना त्रासदायक ठरत आहे. त्यात आता तर पावसाळा आहे. त्यामुळे जर पाऊस पडला तर तो रस्त्यावरचा कचरा ओला होऊन चिखल तयार होतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घाण जमा होते. या संपूर्ण समस्यांबाबत स्थानिक लोक आणि वाहनचालकांमध्ये प्रशासनाच्या बाबतीत नाराजी आहे.
या संदर्भात आम्ही घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांच्या समस्या जाणून घेतल्या, असत्या त्यांनी आपल्या व्यथा मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केल्या.