राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला

राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदी-शाह यांच्याविरोधात भुमिका घेत राज्यात प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळं राज ठाकरेंची काँग्रेस-राष्ट्रवादीशी वाढती जवळीक भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत देत आहे.
मनसेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी ?

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदी-शाह यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फारसा फायदा झाल्याचं निकालावरून तरी दिसत नाही. शिवाय मनसेनं लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं आता विधानसभा निवडणूकांमध्ये मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार का, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आज राज ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतल्यानं या चर्चेला अधिक वेग आलाय.

ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या – राज ठाकरे

दरम्यान, राज ठाकरेंनी सोनिया गांधींच्या भेटीआधी निवडणूक आयुक्तांची भेट घेत ईव्हीएमबाबतच्या शंका विचारल्या. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहेत. कारण ज्यावेळी मी आयुक्तांशी बोलत होतो, त्यांच्या चेह-यावर जे हावभाव होते, त्यावरून त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य असल्याचं दिसलं नाही, अशी प्रतिक्रिया राज यांनी दिलीय. केवळ औपचारिकता म्हणून ही भेट घेतल्याचं राज यांनी सांगितलं. मॅच फिक्स असेल तर तयारी करण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केलाय. या ईव्हीएमची चीप ही अमेरिकेहून येत असेल तर हॅकिंगची शक्यता आहेच, असंही राज यांनी म्हटलंय.