Home > मॅक्स वूमन > लैंगिक जीवन व घटस्फोट

लैंगिक जीवन व घटस्फोट

लैंगिक जीवन व घटस्फोट
X

रात्री बायकोचा प्रतिसाद अतिशय थंड असतो, असे म्हणणारेही मोठ्या संख्येने आहेत. हेच कारण पुढे घटस्फोटासाठी वापरताना दिसतात. मात्र हेच लोक आपली बायको दिवसभर कुटुंबातील सर्वांची काळजी घेते, काय हवे नको ते बघते, आस्थेने सर्वांचं करते म्हणून कौतुक करताना दिसत नाही. दिवसभर इतके शारीरिक श्रम झाल्यानंतर, त्या स्त्रीमध्ये प्रतिसाद देण्याची शारीरिक क्षमताच राहात नाही. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, ती सेक्सला प्रतिसाद देऊ शकत नाही.

भारतात घटस्फोटाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली दिसून येते आहे. या घटस्फोटाच्या कारणांचा जर आपण शोध घेतला तर अनेकदा अतिशय क्षुल्लक कारणांसाठी त्याची मागणी केलेली दिसून येते. बायको वेळेवर जेवण बनवत नाही, स्वयंपाक करत नाही किंवा नवरा माहेरच्यांमध्ये मिसळत नाही, म्हणूनही संसार मोडणारे अनेकजण आहेत. मात्र काही जोडपी खरी कारणं न सांगता, उगीचच काही बाही कारणं देतात, असं निर्दशनास आलं आहे. त्यातील लैगिक संबंधांतील काही प्रश्न असतील, तर ते सोडवायचे प्रयत्न न करता लगेच घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतातही सामाजिक परिस्थितीत बदल घडून येताना दिसत आहेत. बदलत्या विचारसरणीमुळे सेक्सबाबत खुलेपणाने चर्चा होऊ लागली आहे. ही गोष्ट जरी सकारात्मक असली तरीही पाश्चिमात्य देशांप्रमाणेच यौन संबंधातील बिघडत्या नात्यांमुळे भारतातही घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसांपूर्वी केलेल्या एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.

भारतात घटस्फोट घेण्याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे नपुंसकता. एका नव्या संशोधनानुसार, भारतातील २० ते ३० टक्के घटस्फोट हे याच कारणामुळे घेत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा महिला आपल्या लैंगिक जीवनात संतुष्ट नसतात आणि यामुळेच त्या आपल्या पतीपासून घटस्फोट घेतात. भारतातील 'अल्फा वन अँड्रॉलॉजी ग्रुप' आणि पुरुषांच्या लैंगिक समस्यांचे समाधान करणाऱ्या डॉक्टरांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे. यामध्ये जवळजवळ २५०० नपुंसक पीडित भारतीय पुरुषांवर हे संशोधन करण्यात आलं आहे. वयाच्या ४० वर्षांनंतर ५० टक्के पुरुषांमध्ये लैंगिक समस्या दिसून येतात. लैंगिक समस्येमुळे आपल्या पत्नीला लैंगिक जीवनात संतुष्ट न करू शकल्यामुळे, प्रत्येकी पाच पुरुषांमधील एका व्यक्तीचा घटस्फोट होतो; तर, १० पुरुषांमधील एका पुरुषाचे वैवाहिक जीवन उद्धवस्त झाले आहे. अनेकदा नपुंसकपणा हा काही तरी विचित्र रोग आहे, असे समजून या समस्येवर विचित्र पद्धतीने उपचार केले जातात आणि यामुळे समस्येत आणखीच भर पडते. मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे लैंगिक समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर आजची बदललेली जीवनशैली, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन, स्थूलपणा यांसारख्या गोष्टींमुळे देखील लैंगिक समस्येत भरच पडते.

भारतात लैंगिक उदासीनता हे घटस्फोटासाठी एक कारण म्हणून वापरले जाते. कायद्याने जर स्त्री अथवा पुरूष लग्नानंतर लैंगिक संबंधामध्ये असमाधानी असले तर घटस्फोटासाठी ते एक वैध कारण ठरते. दोघांच्या लैंगिक असमाधानासाठी नपुंसकता आणि उदासीनता या कायदेशीर बाबी मानल्या जातात. आजकाल केवळ तीनच महिन्यांत 'जमत नाही' म्हणून घटस्फोट घेणारी जोडपी आपल्याला दिसतात. रात्री बायकोचा प्रतिसाद अतिशय थंड असतो, असे म्हणणारेही मोठ्या संख्येने आहेत. हेच कारण पुढे घटस्फोटासाठी वापरताना दिसतात. मात्र हेच लोक आपली बायको दिवसभर कुटुंबातील सर्वांची काळजी घेते, काय हवे नको ते बघते, आस्थेने सर्वांचं करते म्हणून कौतुक करताना दिसत नाही. दिवसभर इतके शारीरिक श्रम झाल्यानंतर, त्या स्त्रीमध्ये प्रतिसाद देण्याची शारीरिक क्षमताच राहात नाही. मात्र याचा अर्थ असा होत नाही की ती सेक्सला प्रतिसाद देऊ शकत नाही. सेक्स ही शरीर आणि मन यांनी एकत्रितरित्या केलेली कृती असते, त्यामुळे जर पतीने तशी काळजी घेतली तर नक्कीच प्रश्न सुटू शकतात. त्यावर घटस्फोट हा उपाय नक्कीच नाही.

कुटुंबाचा पाया जरी सेक्सवर आधारित असला, तरी कुटुंब जोपासण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. प्रेम, माया, एकमेकांविषयी आपुलकी हे काही एका दिवसात तयार होत नाही. स्वस्थ लैंगिक जीवनाकरिता दोघांमध्ये सामंजस्याची भावना फार महत्त्वाची असते. तसेच अशा समस्येमुळे आपली समाजात नाचक्की होईल, या भीतीने अनेकदा पुरुष डॉक्टरांकडेही जाणे टाळतात. मात्र यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य धोक्यात येऊ शकते, याचे भान पुरुषांनी राखायला हवे. वस्तुतः वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होण्यात समाधानी लैंगिक जीवनाचा फार मोठा वाटा आहे. वैवाहिक जीवनात सुखदुःखाचा वाटा पतीपत्नीने समानतेने उचलायला हवा.

एका सुखी दाम्पत्याचं लैंगिक जीवन अस्ताव्यस्त करणारी घटना घडली. एका अपघातात बायको प्रचंड जखमी झाली. जगते की नाही, अशीच शंका होती. मात्र अनेक प्रयत्नानंतर तिचा जीव वाचला. तिचा जीव वाचत असताना त्यांचे लैंगिक जीवन मात्र उद्ध्वस्त झाले. अनेक ऑपरेशन आणि दिव्यातून बरी होत असताना डॉक्टरांनी सांगितले की, 'आता कुठल्याही प्रकारे योनी-लिंग संबंध करण्याची क्षमता तिच्यात राहिलेली नाही.' हे ऐकताच तिच्या नवऱ्याला दुसरे लग्न करण्याचे अनेक सल्ले मिळाले. मात्र केवळ योनी-लिंग संबंध म्हणजे सेक्स नव्हे, हे पतीला माहिती होते. त्याने आपल्या बायको सोबत खंबीर उभे राहात तिला आधार दिला आणि आजही हे दोघे अगदी आनंदाने कौटुंबिक जीवन जगत आहेत. याठिकाणी पतीला अगदी सहज घटस्फोट मिळाला असता; मात्र, पतीने तसे केले नाही कारण त्याला तृप्तीची ओढ होती, शरीराची नाही.

वैवाहिक जीवनातील लैंगिक आनंद हा जसा शारीरिक आहे तसाच तो मानसिक व भावनिकही आहे. परस्परांच्या सहवासात एकमेकांना सर्वस्वी जाणून घेणं, एकात्मता व समंजसपणा निर्माण करणं, शरीरांचा शोध घेताना लैंगिक संबंध ही त्याची एक इष्ट आनंददायक परिणती आहे. याची माहिती आवश्यक आहे. कुणा एकाला इच्छा झाली, किंवा संबंध नकोसा वाटला, तर मुळातच त्याबद्दल सूचना देणं शहापणाचं कसं असत, त्यात स्त्रीत्वाला किंवा पुरुषार्थाला धक्का बसण्याचं कारण नाही, हे स्पष्ट केलं पाहिजे. दोघांच्याही इच्छेनं दोघांच्याही आनंदासाठी कुठलंही दडपण न आणता जर लैंगिक संबंध झाला, तरच तो संभोग ठरतो, नाही तर तो नुसता भोगच असतो. तसंच दोघांनीही एकचवेळी आणि दरवेळी आनंदाचा उच्चांक गाठला पाहिजे आणि त्या संभोगसुखाची तीव्रता प्रत्येक वेळी जाणवली पाहिजे, ही भ्रामक कल्पना मोडली जाणे जरुरीचं आहे. संभोगक्रिया कष्ट व दुःखप्रद होत असेल, तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करण्यास त्यांनी लाजू नये, हे सुचविले पाहिजे. अनेक नवविवाहितांना पहिलीच गर्भधारणा नकोशी होते आणि ते गर्भपातासाठी डॉक्टरकडे येतात. अशा पहिल्याच खेपेला गर्भपातास कुणी डॉक्टर तयार होत नाहीत. पण असा प्रसंग येऊच नये, मनोवांच्छित गर्भधारणा व्हावयास हवी असेल, तर आपापसात मोकळेपणानं अगोदरच विवाहानंतर किती दिवसांनी ही जबाबदारी घ्यावयाची, हे ठरवून संततीनियमनाचा सल्ला वेळीच घेणं योग्य ठरेल. अशी चर्चा तुम्ही अगोदरच करा आणि सल्ला घ्या. हे आईनं मुलीला वेळीच सुचविणं महत्त्वाचं आहे. काहींना पहिल्याच आठवड्यात लैंगिक संबंधांनंतर योनीस्राव, योनीमुखावर खाज सुटणं, आग होणं, लघवीची आग होणं सुरु होतं. अशावेळी निराश होऊन घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी परिणामकारक उपाययोजना असते. यावेळेस मुलीच्या शरीरात बदल होत असताना तिला लैंगिक शिक्षणाची माहिती असेल तर ती परिमामकारक ठरते.

विवाहपूर्व अवांच्छित गर्भधारणेचा धोका कसा असतो व जिला अनियमित पाळी असते, तिला कसा फसवतो, स्वतः मुलगी भीतीने पाळी चुकल्याचे कसे लपविते, हे स्पष्टपणे उघड सांगितले पाहिजे. आणि मुलींमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे, नाही तर फार उशीर झाल्यावर मुली डॉक्टरांकडे आणण्यात येतात, आई म्हणते, 'मला कल्पनाच आली नाही' आईवडिलांची एकमेकांतील आदरणीय प्रेमाची नाती, त्यांचे जबाबदार लैंगिक जीवन, दैनंदिन जीवनातील त्यांच्या परस्परपूरक व्यक्तिगत उन्नतीला वाव देणाऱ्या भूमिका ह्या सर्वांचा परिणाम मुलाच्या मनावर सहजरित्या होत असतो. हीच घरगुती संस्कृती त्यांच्या वैवाहिक जीवनाची उद्दिष्ठं व मूल्य ठरवित असते. विवाह म्हणजे काय? त्याचे मूळ काय आणि त्याचे महत्व हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे. केवळ संबंधांसाठी विवाह केला जातो, ह्या भ्रामक कल्पनेतून मुलांना बाहेर काढले पाहिजे. नुसतं शालेय पुस्तकी लैंगिक शिक्षण त्याची गुणवत्ता वाढवू शकत नाही.

स्त्रिया शिक्षित झाल्या, त्यामुळे अनेक समस्या उभ्या राहात आहेत, असा अनेकांचा सूर आपल्याला दिसतो. शिक्षणामुळे आपल्या हक्काची जाणीव स्त्रियांना झालेली आहे. नाही म्हणण्याचे धाडस स्त्रियांमध्ये आले. आपल्या शरीरावर आपला अधिकार आहे. लैंगिक गरजा भागवण्याचा आपल्यालाही अधिकार आहे, याची जाणीव वाढीस लागली. अधिकार तसेच जबाबदारी या सर्वांसोबत योग्य प्रकारचे मार्गदर्शन जर लाभले तर स्त्रियांसोबत पुरूषांचे वैवाहिक जीवन सुखकर होईल.

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 22 May 2021 5:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top