साडीच का?

साडीच का?
X

माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शाळांतील शिक्षिकांना अजूनही साडी नेसणे बंधनकारक असेल तर ते सखेद आश्चर्यकारक आहे. आणि ते तसेच आहे असं भवतालचं चित्र दिसतंय. अगदी डोंबिवलीसारख्या शहरांतही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांवरच्या शिक्षिका बहुतेक साडीतच दिसतात. मी तरी अजून इतर कपड्यांत पाहिली नाही. मुंबईत काय परिस्थिती आहे ठाऊक नाही. जर महानगरांत ही स्थिती, तर खेडोपाडी तर साडी अगदी कंपल्सरी असणार त्यात काही शंका नाही.

हा काय प्रकार ते मला अजूनही कळत नाही. शिक्षिकांना हे बंधन कशाकरता आहे? आजच्या पेपरातही याबद्दल छोटीशी बातमी आहे. अशा बंधनावर आजही या शिक्षिका आवाज उठवत नाहीतॽ न्याय मागत नाहीतॽ मुळात त्यांनी साडीच नेसावी यामागचं गणित नेमकं कोणतं आहेॽ साडी ही भारतीय संस्कृती आहे म्हणूनॽ मग धोतरही भारतीय संस्कृती आहे. शिक्षकांना त्याची सक्ती का नाहीॽ या संस्कृतीच्या चिंध्या अजून किती दिवस बायकांच्या कंबरेला गुंडाळून जपणार आहातॽ

कुणी म्हणे मुलांच्या मनात शिक्षिकांची प्रतिमा चांगली राहायला हवी म्हणून आहे. साडी नेसून मुलांच्या मनात शिक्षिकांची प्रतिमा चांगली राहतेॽ कुणी सांगितलं या येडपटांनाॽ अहो, साडीतून दिसणाऱ्या बाईंच्या पोटाकडे, उघड्या पाठीकडे, फळ्याकडे वळल्यावर एका बाजूने ब्लाऊजमधून दिसणाऱ्या छातीच्या आकाराकडे ही पोरं चोरून, निरखून बघत असतात, त्यावरून आपसात टवाळ्या करत असतात. शाळेतल्या या बाया, (आता बाईच म्हणतात, तर मग अनेकवचन बायाच होणार ना. शिक्षिकेला बाई म्हणणारी ही भाषा देखील थोरच म्हणायला हवी. कामवाली पण बाई, शिकवणारी पण बाई... बाई, बाई, धन्य आहे बाई! पुरुष मात्र गुरूजी... वाह रे गुरू... मग त्याला का नाही ‘ओ बाप्या’ किंवा ‘गड्या’ म्हणून हाक मारायची...ॽ) तर शाळेतल्या या बाया कुमार, किशोरवयीन मुलांच्या पहिल्या क्रश असतात हे या ट्रस्टींच्या गावीही असतं काॽ तर हो असतं. हे ट्रस्टीही तेच करून मोठे झालेले असतात. (कदाचित म्हणून तर त्यांना त्यांची बाई, (म्हणजे शाळेतली हो..) साडीतच हवी असं तर नाही नाॽ) आणि असा क्रश होण्यामागे पहिलं कारण, ती अर्धअंग उघडं टाकणारी साडी असते. हे माहिती आहे काॽ असो.

प्रश्न तो नाही. यांच्या संस्कृतीच्या व्याख्या धन्य आहेत. आणि त्या अजून शंभर वर्षे तरी सुधारणार नाहीत. यांच्या संस्कृतीच्या व्याख्येत बायांनी स्वतःला किती दिवस पिसून घ्यायचं अजूनॽ साडी हा अत्यंत अनकम्फर्टेबल प्रकार आहे. (श्रीदेवी साडी नेसून नाचल्याची उदाहरणं देऊ नका. ती साडी नेसून नाचते म्हणजेच साडी किती सेक्सी प्रकार आहे आणि तो लहान मुलांवर किती वाईट परिणाम घडवू शकतो त्यावर विचार करा.)

खरंतर साडी हा प्रकार तसा अनकम्फर्टेबल नव्हता. जेव्हा तो दुटांगी म्हणजेच काष्टा मारून नेसला जायचा तेव्हा तो सुविधाजनक होता. दुटांगी साडीत बाया घोड्यावर बसू शकायच्या, लढू शकायच्या, पोहू शकायच्या. नृत्य करू शकायच्या. सहजपणे उठू बसू, वावरू शकायच्या. परंतु आता जी गोल साडी आणि परकर प्रकार आहे त्यात बसतानाही खूप काळजीपूर्वक बसावं लागतं. नाहीतर मग आहेच, अंबाबाई चिंबाबाई नमस्कार... (आठवतंय ना...) त्यात ना धावता येत ना पळता येत, सायकल, स्कूटरवर बसलं की पायात अडकते. रिक्षेत बसले की पदर बाहेर चाकात अडकतात. लोकलमध्ये खेचल्या जातात.

पीटीला शिक्षिका असतात काॽ मी तरी पाहिली नाही. साडी नेसून पीटी कशी करणारॽ योग कसे करणारॽ व्यायाम कसा करणारॽ खेळ कसे शिकवणारॽ पोहणार कसेॽ की शाळेतल्या शिक्षिकांनी हे सगळं करायचंच नाही. सदैव अवघडलेल्या पेहरावात राहायचंॽ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ज्या मुलांच्या भावनांचा विचार करून त्यांच्या बायांना साड्या गुंडाळल्या जातात, त्या मुलांच्या आया तर घरात गाऊन आणि बाहेर सलवार-कुर्ता, जीन्स, स्कर्टमध्ये कधीच पोचल्यात. अगदी खेडोपाडीही. मग त्यांच्या बायांनीच बापड्यांनी साडीत का राहावं म्हणते मीॽ

हे म्हणजे असं झालं, की आमच्यावेळी मुलगी एसएस्ससीला गेली की तिने कंपलसरी साडी नेसायची असं होतं. मग दहावी झाली. तर आम्हाला दहावीतच साडी कंपलसरी केली होती. मग विनोदी प्रकार असा होऊ लागला होता, की आम्ही नववीपर्यंत स्कर्ट, फ्रॉकमध्ये, दहावीत साडीमध्ये आणि पुन्हा अकरावीबारावीला गेलो की ज्युनिअर कॉलेजला साडी कंपलसरी नसल्याने पुन्हा स्कर्टमध्ये. कारण आमच्यावेळेपर्यंत मुलगी एसएससीला साडीत गेली की आता कायमची मरेपर्यंत साडीतच गेली असं उरलेलं नव्हतं. मुली एसएससीच्या पुढे कॉलेजमध्ये जाऊ लागल्या होत्या, आणि कॉलेजमध्ये बेलबॉटम आलेल्या होत्या, स्लॅक्स आले होते, मॅक्स्या आल्या होत्या. (सगळी नितू सिंग कृपा होती.) तर मथितार्थ असा, की शालेय शिक्षिकांवर साड्यांचे बंधन ताबडतोब सगळीकडे दूर व्हावे. अन्यथा पुरुष शिक्षकांना धोतर कंपलसरी करावे अशी आमची मागणी आहे.*

अलका गांधी-असेरकर

Updated : 2 March 2018 12:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top